पालघर-योगेश चांदेकर
राज्यातील अनेक जिल्ह्यांचं विभाजन अजून झालेलं नाही. नगर, नाशिक, पुणे, बीड, सोलापूर आदी जिल्हे विभाजनाची वाट पाहत असताना राजेंद्र गावित यांनी मात्र ठाण्यातून पालघर हा नवा जिल्हा निर्माण करून घेतला. सर्वंच राजकीय पक्षांशी आणि नेत्यांशी चांगले संबंध ठेवणारे राजेंद्र गावित तसे अजातशत्रूच. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा!
एखाद्या ठिकाणचं रोपटं दुसऱ्या ठिकाणी लावलं, तर ते जगतंच असं नाही. राजकीय नेत्यांनाही मतदारसंघ बदलले, तर किती त्रास होतो आणि जनता ते स्वीकारत नाही. राजेंद्र गावित मात्र त्याला अपवाद आहेत. पालघर जिल्ह्यात त्यांना लगेच यश मिळालं असं नाही. पराभवाचे टक्के टोणपे खात ते आमदार झाले. मंत्री झाले. पदाचा उपयोग त्यांनी सातत्यानं जनसेवेसाठी केला. आदिवासी समाजातून येऊन राजकारणात आपलं स्थान मजबूत करणारे एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संकटांना संधी समजून त्यावर मात करीत पुढं जायचं, हा त्यांचा स्वभाव. कुणी कितीही टीका केली, तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत न पडता विकासकामं आणि जनतेशी बांधीलकी मानण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांच्या जीवनात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. अनेकदा पक्षांतरं करावी लागली. कधी स्वतःच्या सोईसाठी तर कधी पक्षांच्या; मात्र त्यांची पक्षांतरं पालघर जिल्ह्यानं स्वीकारली. डोंगरी, सागरी आणि नागरी जिल्हा असलेल्या पालघर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते होते. त्यात स्वतःची ओळख निर्माण करणं हे मोठं आव्हान होतं. ते पेलून गावित यांनी ते ज्या पक्षात असतात, त्या पक्षाची जशी संघटनात्मक बांधणी केली. तशीच स्वतःच्या कार्यकर्त्यांची एक फळीही तयार केली. त्यामुळं गावित जिथं तिथं ती फळी असं समीकरण तयार झाल्यानं त्यांच्या प्रत्येक पक्षांतरानंतर विजय मिळवणं त्यांना सहजसाध्य झालं. एकाच लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा तीन वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येण्याचा विक्रम अन्य कोणी क्वचितच केला असेल. गावित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते. यापूर्वीही ते पालघर मतदारसंघातून एकदा निवडणूक जिंकले आहेत. २०१४ मध्ये लोकसभा आणि २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी गावित यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. काँग्रेसकडून सातत्यानं होत असलेल्या अपमानाला कंटाळून आपण पक्ष सोडल्याचं गावित यांनी वारंवार सांगितलं आहे. पक्षासाठी योगदान देऊनही ही वागणूक दिल्यानं आपण भाजपत आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पालघर या एकाच लोकसभा मतदारसंघासाठी गावित यांनी तब्बल तीन राजकीय पक्ष बदलल्याचा इतिहास आहे. एवढंच नाही तर एका रात्रीत पक्ष बदलणारा नेता म्हणून मतदारसंघात त्यांच्याबद्दल चर्चा होत असते. अर्थात प्रतिकूल चर्चेचं विजयात रुपांतर कसं करायचं हे तंत्र त्यांना चांगलंच अवगत झालं आहे. २०१८ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्यावर त्यांना भाजपनं पक्षात घेतलं. त्या वेळी गावित यांनी श्रीनिवास वनगा यांचा पराभव करून लोकसभेचं सदस्यत्व मिळवलं. पुढं सात महिन्यांतच १७ व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्या वेळी पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्या वेळी गावित यांनी थेट मातोश्री गाठली आणि शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळवली. २०१९ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. या प्रत्येक पक्षांतराच्या वेळी काँग्रेस वगळता अन्य पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन नंतर त्यांनी पाऊल उचलल्यामुळं त्यांच्याविरोधात कुठंही उद्रेक झाला नाही. गावित हे आदिवासी समाजातील एक मोठा चेहरा म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणं पसंत केलं. आता मतदारसंघ भाजपला गेल्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या समंतीनंच भाजपत प्रवेश केला. अर्थात त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार नव्हतीच. प्रचाराची एक फेरी झाल्यानंतर उमेदवारी मिळत नसेल, तर एखाद्यानं बंड केलं असतं, त्रागा केला असता;परंतु गावित यांनी यापैकी काहीच केलं नाही. गावित आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत. मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या गावित यांचा आतापर्यंत शिवसेना व्हाया भाजप असा रंजक प्रवास झाला आहे. पालघर जिल्हा मुंबईपासून नजीकच्या अंतरावर असला, तरी आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. या मतदारसंघातील राजकारणाची चाल ही नेहमीच वेगळी राहिली. पूर्वीपासून काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात मूळच्या काँग्रेसच्याच असलेल्या गावित यांनी काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढत भाजपला विजय मिळवून दिला होता. गावित यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांची राजकीय कारकीर्द फार मोठी नसली, तरी त्यांची आतापर्यंतची वाटचाल पाहता आगामी काळात ते पालघरच्या स्थानिक राजकारणातील महत्त्वपूर्ण घटक ठरतील. लोकसभेला थांबवताना त्यांना राज्यात चांगली जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांली त्यांचं सूत चांगलंच जुळतं.
कुपोषित बालकांच्या मदतीसाठी त्यांनी विठू माउली ट्रस्टच्या आगामी पुनर्वसन आणि आरोग्य केंद्रासाठी पन्नास लाख रुपयांची देणगी दिली. पालघर जिल्हा कुपोषणुक्त करण्याचा त्यांचा निर्धार आहे. खासदार असताना भाईंदर-विरारसाठी त्यांनी एक हजार कोटी रुपयांचा निधी आणला होता. पालघर जिल्ह्यात विविध पायाभूत विकास प्रकल्प, जव्हारचं रुग्णालय, पालघर जिल्हा रुग्णालय अशी कितीतरी कामं गावित यांचं नाव घेताच आठवतात. त्यांच्याच प्रयत्नांमुळं बोईसरसह पालघर तालुका पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यास पात्र ठरला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासह पालघर तालुक्यातील अनेक गावं पंतप्रधान आवास योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आल्याचं ‘नॅशनल हाऊसिंग बँके’नं जाहीर केलेल्या यादीत आढळून आलं. त्यानुसार तालुक्यातील अनेक रहिवासी संकुलात आवास योजना लागू करण्यात आली होती. काही खासगी बँकांनी या योजनेंतर्गत लाभार्थींना कर्जही उपलब्ध करून दिल्यानं काही बिल्डरांनी लाभार्थींना फ्लॅटची विक्री केली होती. बोईसर, सरावली आदी भागात उभारलेल्या रहिवासी संकुलात पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळण्याच्या पार्श्वभूमीवर हजारो लाभार्थींनी या योजनेतून मिळणाऱ्या दोन लाख ६७ हजारांच्या अनुदानाचा लाभ मिळेल या आशेवर आपल्या फ्लॅटची नोंदणी केली होती.
नोंदणी करण्यात आल्यानंतर ‘आयआयएफएल’सह अनेक खासगी वित्तधारक कंपन्यांनी फ्लॅटधारकांना कर्ज पुरवठा करीत अनुदानाची रक्कम देण्याचं प्रयोजन सुरू केलं होतं; परंतु तीन वर्षांनंतर अचानक त्यांना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम पुन्हा कर्ज खात्यात वळविण्यात आल्यानं बँक हप्त्याच्या रक्कमेत मोठी वाढ होत गरीब लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातून गावित यांनीच केंद्र सरकारकडं पाठपुरावा करून मार्ग काढला. मीरा भाईंदरपर्यंत आलेली मुंबई मेट्रो पुढे वसई-विरार पर्यंत मंजूर करत वसई विरार मेट्रो कॉरिडॉर मंजूर केला जावा, यासाठी गावित यांनी पाठपुरावा केला. पालघर जिल्ह्यातील वाढीव गावातील ग्रामस्थांना वैतरणा पुलावरून रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. या प्रवासात शाळकरी लहान विद्यार्थ्यांपासून अनेक प्रवाशांना या पुलावरून प्रवास करताना आपला जीव गमवावा लागला आहे, म्हणून या पुलावर पादचारी पूल रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर उभारावा अशी मागणी गावित यांनी रेल्वे प्रशासनाकडं केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं असून वैतरणा पुलावर पादचारी पूल बनविण्यास मान्यता देण्यात आली. पालघर येथे लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना थांबा देण्याबाबत आणि इगतपुरी-डहाणू या लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचाही त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यातील काही प्रश्न सुटले. विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.