पालघर-योगेश चांदेकर
पावणेपाच कोटींची बिले थकल्याने ठेकेदार विमनस्क
पालघरः राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठेकेदारांना लवकरच थकीत बिल देण्याचे जाहीर केले असले, तरी आता ठेकेदारांचा संयम सुटत चालला आहे. सांगलीचे ठेकेदार हर्षल पाटील यांनी थकीत बील न मिळाल्याने जगायचे कसे, या विवंचनेतून आत्महत्या केल्यानंतर आता पालघरच्या ठेकेदाराने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राज्यात सुमारे पाच लाख ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्य विभाग, जलसंधारण विभाग तसेच अन्य विभागाची विविध कामे केली आहेत. ही कामे करूनही गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांना बिले मिळाली नाहीत. हा आकडा सुमारे एक लाख वीस हजार ते एक लाख 45 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. राज्यात गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या दहा हजार कोटी रुपयांची बिले संबंधित ठेकेदारांना दिली आहेत; परंतु अजूनही सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची बिले थकली आहेत.
बिले न मिळाल्याने ठेकेदार उद्विग्न
राज्य सरकारने विविध पायाभूत सुविधांची कामे काढूनही बिले मिळत नसल्याने आता ठेकेदार निविदा भरायला तयार नाहीत. त्यामुळे विविध पायाभूत सुविधांची कामे ठप्प झाली आहेत, तर राज्यातील रस्ते पावसाळ्यातही खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे त्यातून प्रवास करताना नागरिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मात्र केवळ आश्वासने देत असून ठेकेदारांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.
आमदार, खासदारांचा पाठपुरावाही येईना कामाला
बिले मिळत नसल्याने ठेकेदार आता हवालदिल झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील निमिल गोहिल या ठेकेदाराने मच्छीमारांना मूलभूत सुविधा पुरण्याच्या कामाची निविदा भरली होती. त्यानुसार गेल्या वर्षीच त्यांनी चार कोटी बहात्तर लाख रुपयांचे काम पूर्ण केले आहे. या कामाची नोंद त्यांच्या मोजमाप पुस्तिकेत झाली असून त्यांना काम पूर्णत्वाचे आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे; परंतु दीड वर्षांपासून निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून त्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही निधी नाही, हे एकमेव कारण पुढे केले जात आहे. याबाबत खासदार डॉक्टर हेमंत सवरा आणि आमदार राजेंद्र गावित यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनीही या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले; परंतु अद्यापही पैसे मिळाले नाही.
तगादेदारांना तोंड देताना घुसमट
गोहिल यांचे पावणे पाच कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे ते मजुरांचे तसेच ज्यांच्याकडून बांधकामाचे मटेरियल घेतले, त्यांना पैसे परत करू शकले नाही. या लोकांचा तगादा पूर्ण करणे ही आता अवघड होत आहे. घर खर्च कसा चालवायचा, आरोग्याची काळजी कशी घ्यायची, मुलांचे शिक्षण कसे करायचे, असे सर्वच प्रश्न शासनाच्या केवळ एका चुकीमुळे निर्माण झाले आहेत.
कोट
सरकारने 14 ऑगस्टपर्यंत पैसे दिले नाहीत, तर मच्छीमार विभागाच्या आयुक्त कार्यालयात पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे. पावणेपाच कोटी रुपये थकल्याने आता नवीन कामे घेण्यासाठी भांडवल राहिले नाही. उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने आता जगायचे कसे हा प्रश्न असून त्यामुळेच आता जीवन संपवण्याच्या मनस्थितीपर्यंत आलो आहे.
निमिल गोहिल, ठेकेदार, पालघर