पालघर-योगेश चांदेकर
विकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी सर्वेक्षण उपयुक्त
सरपंच कल्पेश राऊत यांचा नवा उपक्रम
पालघरः राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना असतात; परंतु या योजना लोकांपर्यंत पोहोचतात असे नाही; शिवाय अलीकडच्या काळात जनगणना व अन्य सर्वेक्षण झाली नसल्यामुळे गावातील लाभार्थींची संख्या व अन्य तपशील मिळण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर कासटवाडी येथील लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांनी गावाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमाची सुरुवात नुकतीच झाली. स्वखर्चातून गावाचे सर्वेक्षण हा आगळावेगळा उपक्रम राऊत यांनी हाती घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पालघर हा आदिवासी जिल्हा आहे. या आदिवासी जिल्ह्यात लोकांना केंद्र व राज्य सरकारच्या तसेच आदिवासी विभागाच्या अनेक योजनांची माहिती नसते. योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि सरकारी यंत्रणा लोकांना आपल्यापर्यंत येऊ देत नाही, अशी एकूण परिस्थिती असते. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक योजना संबंधित लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम सरपंच कल्पेश राऊत यांनी हाती घेतला आहे.
सरपंच आपल्या दारी उपक्रम
पालघर जिल्हा परिषदेत ‘सरपंच आपल्या दारी योजना आपल्या घरी’ हा पहिलाच उपक्रम असून, या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य गुलाब राऊत, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राऊत आदींच्या उपस्थितीत झाली. जव्हार तालुक्यातील कासटवाडी मधील सर्व गाव, पाड्यातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या वेळी ग्रामस्थांना विकासकामाबद्दल काय अडचणी आहेत, हेही जाणून घेतले जाणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत लाभार्थी निवड, आधार कार्ड, जातीचा दाखला, मतदान कार्ड, घरकुल शिधापत्रिका, जॉब कार्ड, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता आदींसाठी विविध कल्याणकारी योजना, या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे आदींची माहिती या सर्वेक्षणाच्या वेळी ग्रामस्थांना देण्यात येणार आहेत.
कागदपत्र उपलब्ध करून देणार
सरपंच कल्पेश राऊत यांच्या प्रयत्नांतून लाभार्थींना आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा रोजगार प्रशिक्षण योजना, लेक लाडकी योजना, वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आनंद दिघे दिव्यांग योजना आदी योजनांपासून कुणीही वंचित राहू नये, याची दखल घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणातील आकडेवारीचा आधार राऊत घेणार आहेत. एखादा गरीब या योजनेपासून वंचित राहिला तर त्यातून चुकीचा संदेश जातो, हा त्यामागचा उद्देश आहे. कासटवाडी ग्रामपंचायतच्या या सर्वेक्षणाच्या वेळी ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे, उपसरपंच त्रिंबक रावते, ग्राम पंचायत सदस्य शंकर टोकरे आदी उपस्थित होते