banner 728x90

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष संपादकीय…

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघर मोठ्या व्यक्तींच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्ती मोठ्या होतात, असं समजलं जातं. बीज शुद्ध असलं, तरी फळंही चांगली येतात. अर्थात हा काही सार्वत्रिक नियम नाही. मोठ्या झाडाखाली झुडपं येत नाही. ती खुरडतात. काही त्याला अपवाद असतात. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचं नाव त्यात घेतलं जातं. संयम, निष्ठा आणि परिश्रम यांच्या जोरावर असाध्य ते साध्य करून पुढं जाता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा!

banner 325x300

तत्कालीन ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यात जी काही मोजकी नावं घेतली जातात, त्यात विष्णू सवरा, चिंतामण वनगा, राम नाईक, प्रा. राम कापसे, रामभाऊ म्हाळगी अशी काही नावं पुढे येतात. त्यातही पालघर जिल्हा आणि परिसरात चिंतामण वनगा आणि विष्णू सवरा यांनीच भारतीय जनता पक्ष आदिवासी वाड्या-पाड्यात, खेड्यात पोहोचवला. पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री असलेल्या विष्णू सवरा यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून डॉ. हेमंत सवरा पुढं आले. राजकारणाच्या पदार्पणात पहिला पराभव पदरी पडल्यानंतर काही लोक नाउमेद होतात. उच्चशिक्षित लोकांच्या बाबतीत तर हे हमखास घडतं. राजकारणापेक्षा आपला व्यवसाय बरा असं अनेकांना वाटू लागतं; परंतु सच्चा कार्यकर्ता पराभवानं कधीच नाउमेद होत नाही. विजयाचा उन्माद त्याला होत नाही. पक्ष देईल ती कामगिरी आणि पक्ष सोपवील, ती जबाबदारी पार पाडणं हेच निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काम असतं. डॉ. हेमंत सवरा त्यापैकीच एक. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाल्यानंतर ते घरी बसले नाहीत. पराभव मनाला लावून घेतला नाही. आपलं कुठं काय चुकलं याचं त्यांनी चिंतन केलं. पक्षाला दोष न देता आपण कुठं कमी पडलो आणि आपल्याला काय सुधारणा करणं आवश्यक आहे, हे त्यांनी ताडलं. त्यातून धडा घेतला राजकीय आणि सामाजिक प्रवास सुरू केला. कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवला. निवडून आलो नसलो, तरी प्रश्नांची बांधिलकी कायम ठेवावी लागते. या मनोवृत्तीतून त्यांनी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. हेमंत यांच्या भगिनी निशा या रिंगणात होत्या. त्या वेळी डॉ. हेमंत यांच्यावर त्यांच्या निवडणूक प्रचाराची व्यवस्थापनाची जबाबदारी होती, ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली. मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालयात अंतर्गत असणाऱ्या ग्रँड मेडिकल महाविद्यालयात त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतली. अस्थिरोग विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पालघर तालुक्यातील तलवाडा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. मुंबईतील नायर रुग्णालय व कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांनी निबंधक म्हणून प्रत्येकी दोन दोन वर्षे काम केले. गेल्या काही वर्षात पालघर जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व कमी होत होतं. अनेक नेते भाजपकडून दोन्ही शिवसेनेत जात होते. अशावेळी डॉ. सवरा यांनी भाजप सावरण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि राजकारणात झोकून दिलं.

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पालघर लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं. सर्वात शेवटी डॉ. हेमंत सवरा यांची उमेदवारी जाहीर झाली, तरीही त्यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट यांची व्यवस्थित मोट बांधली. समन्वयात कुठंही लूपहोल राहणार नाहीत, याची दक्षता घेतली. वरिष्ठांना विश्वासात घेऊन प्रचाराचं योग्य नियोजन केलं. अतिशय कमी कालावधी मिळूनही पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एक लाख ६५ हजारांच्या मताधिक्यानं डॉ. सवरा निवडून आले. २०१९ च्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील पराभवाची परतफेड त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत केली. देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे विविध प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आले असले, तरी त्यांचच्या एकूण कामगिरीचा आलेख पाहता आणि पत्र व्यवहारावरून तरी ते एक रुळलेल्या खासदारासारखे वावरत आहेत. निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं काम त्यांनी काय केलं असेल, तर ते म्हणजे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील दळणवळणाचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. त्यातील काही मार्गी लावले. उपनगरीय रेल्वे, मेट्रो तसेच पालघरसह अन्य शहरांच्या रेल्वे स्थानकांचे प्रश्न त्यांनी मांडून त्यावरच ते थांबले नाहीत, तर संबंधित ठिकाणी काय काय करायला हवं, याचा एक आराखडा त्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला. डहाणू-नाशिक लोहमार्गाची चर्चा वर्षानुवर्षे होत असली, तरी हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आदिवासी भागाच्या विकासासाठी त्यांच्या रोजगारासाठी आणि पर्यायानं पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी डहाणू-नाशिक हा रेल्वे मार्ग होत नसेल, तर त्याला पर्यायाचा उमराळी-विक्रमगड-खोडाळा-इगतपुरी आणि ठाणे-भिवंडी-अंबाडी-वाडा-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक या दोन रेल्वेमार्गाची मागणी त्यांनी वैष्णव यांची भेट घेऊन केली. पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल आणि पालघरला मध्य रेल्वेशी जोडून थेट कोलकत्ता, चेन्नईपर्यंत जलद गतीनं जाता यावं, पालघर जिल्ह्यातील चिक्कू, तांदळासह अन्य उत्पादनं देशाच्या बाजारपेठेत जावीत, यावर त्यांचा भर आहे. आपले पिताश्री विष्णू सवरा यांनी अखेरच्या क्षणापर्यंत या मार्गाचा कसा पाठपुरावा केला होता, हेही त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. नवीन रेल्वे गाड्या सुरू करणं, पालघर जिल्ह्याच्या रेल्वेच्या समस्या, त्यावर उपाययोजना करणं, बाहेरगावी जाणाऱ्या लांब पडल्याच्या गाड्यांना पालघर तसंच अन्य स्थानकावर थांबा देणं याबाबतही त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला.

नवीन सुचवलेले मार्ग प्रत्यक्षात आले, तर केवळ पालघरच्याच नाही, तर नाशिक जिल्ह्याच्या विकासालाही कशा प्रमाणात चालना मिळू शकेल आणि नाशिक आणि गुजरातच्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा मधला मार्ग किती उपयुक्त ठरेल, हे त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. निवडून आल्यानंतर सातत्यानं पायाला भिंगरी लावल्यासारखे डॉ. सवरा फिरत आहेत. मतदारसंघातील अडीअडचणीची माहिती घेता येत वेगवेगळ्या प्रश्नावर बैठका घेत आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गामुळं होणाऱ्या वाहतूक कोंडीविषयी संबंधितांना सूचना करीत आहेत त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. निवडणूक आचारसंहितेमुळं राजकारण्यांना घोषणा करायला आणि प्रत्यक्ष मदत मिळवून द्यायला अडचणी असल्या, तरी संबंधिताचं दुःख जाणून घेऊन ती प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं. हे काम डॉ. हेमंत सवरा यांनी केलं. पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात असताना अशा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम डॉ. सवरा यांनी बांधावर जाऊन केलं. काही शेतकऱ्यांनी भाताची काढणी करून पीक तसंच ठेवलं होतं. हे पीक पाण्यात तरंगत होतं. काही ठिकाणी मोड आले होते. त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला त्यांनी याबाबत लक्ष घालण्याचं सुचवलं. डॉ. सवरा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांची भेट घेऊन त्यांच्याकडं पालघर येथे ‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. पालघरला पाच एकर जागा उपलब्ध असून ती देण्याची तयारी दाखवल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी पालघरला ‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू करण्यास तत्वता मान्यता दिली. पालघरच्या आणि अनेक प्रश्न संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि पालघरला रुग्णालय उपलब्धतेची किती गरज आहे, हे त्यांनी पटवून दिलं. पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण असून या ठिकाणी पाच हजार उद्योग आहेत सुमारे दहा लाख कामगार वेगवेगळ्या उद्योगात काम करीत आहेत; परंतु त्यांच्यासाठी ‘ईएसआयसी’ रुग्णालय नाही. त्यामुळं कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार मिळत नाहीत. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला एक दशक पूर्ण झालं असलं, तरी हा प्रश्न मात्र कायम असल्यानं कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अन्यत्र ज्यादा खर्च करू उपचार घ्यावे लागतात. मंत्र्यांच्या भेटीच्या वेळी त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी पालघर येथे एक आदर्श रुग्णालय बांधण्यास तत्वतः मंजुरी दिली. पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर डॉ. सवरा यांनी मिळवलेलं हे मोठं यश आहे. डॉ. सवरा यांनी पालघर जिल्ह्यात क्रीडा पायाभूत सुविधा नसल्याचं संमधीत विभागाच्या मंत्री यांच्या लक्षात आणून दिलं. पालघर हा आदिवासी जिल्हा असून या आदिवासी जिल्ह्यातील मुलं-मुली वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात नैपुण्य दाखवत आहेत. असं असताना केवळ त्यांना पायाभूत सुविधा मिळत नसल्यानं पुढं जाता येत नाही. प्रगती खुंटते. त्यांना राज्य आणि देशपातळीवर आपली चमक दाखवता येत नाही. एकीकडं केंद्र सरकार ‘खेलो इंडिया’ हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवित असताना पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल नसल्याचं निदर्शनास आणून देऊन त्यामुळं या जिल्ह्यातील खेळाडूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं खा. सवरा यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन मंडविया यांनी दिलं. पहिल्याच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पालघर जिल्ह्याचे विविध प्रश्न सरकार दरबारी मांडून पालघर जिल्ह्यात विकासाची नवी गंगा आणण्याचे काम डॉ. हेमंत सवरा हे करत आहेत. वाढवण बंदराला अनेकांचा विरोध असला, तरी वाढवण बंदराच्या माध्यमातून पालघर जगाच्या नकाशावर आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असताना खा. सवरा यांचं ही त्यात मोठं योगदान आहे. पालघर जिल्ह्यात नव्यानं दहा लाख रोजगार निर्माण होणार असून स्थानिक भूमिपुत्रांना संधी मिळावी, यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याच्या डॉ. सवरा यांनी केलेल्या मागणीला यश आलं आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!