पालघर-योगेश चांदेकर
पालघर- परिस्थिती कुठली असली, तरी तिच्यावर मात करून, ज्या मातीतून आपण आलो, त्या मातीशी नाळ कायम ठेवून, त्या मातीतल्या माणसासाठी काही करायचं ही धडपड ज्यांच्या अंगी आहे, त्यांचं दुसरं नाव म्हणजे वैभव संखे. दातृत्व म्हणजे औदार्य किंवा दानशूरता. दाता हा शब्दच मुळात महानता दाखवून देतो; परंतु केवळ दातृत्व असून चालत नाही, तर दिलेलं दान सत्पात्री पडलं की नाही तेही पहावं लागतं. हे पाहण्याचं काम वैभव संखे यांनी आयुष्यभर केलं आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं शुभेच्छा.

‘ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत!
ज्यांचे सूर जुळून आलेत
त्यांनी दोन गाणी द्यावीत!
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे!
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे!
सोलापूरचे कवी प्रा. दत्ता हलसगीकर यांची ही कविता. ती वैभव संखे यांना तंतोतंत लागू होते. त्यांच्यावर संस्काराचे मोती लहानपणीच पडले आणि त्या संस्कारातून मोठे होत उद्योग व्यवसायात त्यांनी नाव कमावलं. असं असलं, तरी आपण ज्या ठिकाणाहून आलो आणि जिथं आपण कार्यरत आहोत, तिथली परिस्थिती बदलली पाहिजे, ही मानसिकता त्यांनी कायम ठेवली. उद्योग आणि राजकारण यांची सांगड घातली. वरिष्ठांशी संबंध असले, तर त्याचा फायदा फक्त स्वतःसाठीच करून घेऊन चालत नाही, तर आपण ज्या भागात राहतो, त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्या ओळखीचा आणि पदाचा उपयोग केला पाहिजे, हे मनोमन कायम ठेवून त्या दृष्टीनं वैभव हे वाटचाल करीत आहेत. आपण जेव्हा एखादं काम करतो, एखाद्या व्यक्तीला वस्तू किंवा पैशाच्या रूपानं मदत करत असतो, तेव्हा ते घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही, असं वैभव संखे मानतात. कळत, नकळतपणे त्या व्यक्तीच्या सद्भावना आपल्या पाठीशी असतात आणि त्या सद्भावनाच्या जोरावर आपली वाटचाल कायम पुढं सुरू राहत असते, असं त्यांना वाटतं. दात्याची एक वेगळी ओळख असते. त्यानं एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. निस्वार्थ भावनेनं केलेलं दान शाश्वत आनंद मिळवून देतं. मी दान केलं ही भावना सातत्यानं राहिली तर त्यातून अहंभाव वाढतो आणि केलेलं दान हे निस्वार्थी न राहता त्यात मीपणाचा भाव येतो, म्हणूनच एखाद्याला आपण काही देतो, तेव्हा तेव्हा आपला विवेक सातत्यानं जागृत आहे, की नाही हे पाहावं लागतं. सजगपणे केलेलं दान हेच पुण्याचं ठरतं. वैभव यांचा यावर विश्वास आहे. त्यामुळं संकटात धावून जाताना कोणावर उपकार करतो, अशी भावना त्यांच्या ठायी कधीच नसते. ‘करमतारा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’च्या तसेच ‘कमला फाउंडेशन’च्या माध्यमातून अनेकांचे अश्रू पुसताना त्यांची हीच भावना होती. तोक्तो वादळाच्या वेळी त्यांनी आपत्ती सापडलेल्या लोकांना मदत म्हणून हजारो टन अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य वाटप केलं. केवळ इतरांवर ती जबाबदारी सोडून ते मोकळे झाले नाहीत, तर स्वतः लोकांच्या घराघरापर्यंत ही मदत कशी मिळेल याची व्यवस्था त्यांनी केली.
एक राजकीय आणि सामाजिक भान असणारं व्यक्तिमत्व म्हणून वैभव यांची ओळख आहे. त्यांचे सर्वंच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या कामामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही प्रभावीत झाले आहेत, त्यामुळं तर मुख्यमंत्र्यांनी वैभव यांच्या कार्यालयाला भेट दिली. राजकारण, उद्योग, समाजकारण करतानाही त्यांनी कौटुंबिक जबाबदारीकडं कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. वडिलांना दिलेल्या शब्दाची कायम जाणीव ठेवली आणि त्यादृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू राहिली. दिव्यांगाचं जगणं सन्मानाचं झालं पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. वैद्यकीय उपचारातून एखाद्या गरीबाचा जीव वाचवण्यासाठी लागणारी आर्थिक मदत असो अथवा अन्य; अशावेळी वैभव संखे यांचं नाव पालघर जिल्ह्यात कायम घेतलं जातं. एखाद्या व्यक्तीला सतत मदत घेण्याची सवय लागली, तर ती व्यक्ती काही न करता ऐदी होईल आणि सतत आपल्याकडे अशा भूतदयेच्या नजरेनं पाहत राहील, हा धोका त्यांच्या लक्षात येतो. त्यामुळंच तर दिलेली मदत सत्पात्री आहे, की नाही आणि आपण दिलेल्या मदतीतून इतरांना मदत करणारे हात पुढं येतात की नाही हे पाहणंही दात्याचं काम असतं. वैभव हे त्या दृष्टीने सजत असतात. अशा वृत्तींना पायबंद घालून कायम इतरांना मदत करण्यात ते पुढे असतात. निस्वार्थ दातृत्व हा त्यांचा गुण आहे. समाजात सगळंच काही पैशानं किंवा वस्तुरूपानं देता येत नाहीत. ज्याच्या त्याच्या कृतीनुसार आणि वैचारिक सामर्थ्यानुसार प्रत्येक जण कधी ना कधी भाकरी देत असतो. वस्तू छोटी किंवा मोठी हे महत्त्वाचं नसतं. त्यामागील दातृत्वाची भावना महत्त्वाची असते, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे समोरच्या गरजू व्यक्तीला आध्यात्मिक सुंदर विचारांची देवाण निस्वार्थ भावनेने करण्याचं काम ते करतात आणि त्यातून एक प्रकारची ईश्वरसेवाच आहे, असं ते मानतात. आपल्याला मिळाला आनंद इतरांना वाटण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि हे आनंद वाटण्याचं काम वैभव हे सातत्यानं करीत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढं आलेल्या आणि स्वकर्तृत्वावर एक मोठा उद्योग, व्यवसाय उभारलेल्या वैभव संखे यांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे, त्यांची वेगळी शैली आहे आणि या शैलीतून त्यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीतून लोक जोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत त्यांच्या कामाची महती गेल्याने शिंदे यांच्याकडून वैभव यांची नोंद झाली. वैभव यांच्या मदतीनं अनेक संसार सावरले उभे राहिले अनेकांच्या डोळ्यातील अश्रु पुसले.
त्यांनी त्यांच्या कार्य कुशल नेतृत्वाची उपयुक्तता शिवसेनेत काम करताना दाखवून दिली. पालघर जिल्ह्यात पर्यटन विकास, सामाजिक उपक्रम आदी अनेक विकासकामांना त्यांनी शिंदे यांच्या माध्यमातून निधी मिळवला. शिंदे यांनीही पालघर जिल्ह्यात विकासकामं करताना कायम वैभव यांच्या सूचनांना प्राधान्य दिलं. त्यामुळे पालघर तालुक्यातील दापोलीसारखं दुर्लक्षित गाव आज पर्यटनाच्या नकाशावर आलं आहे. दापोली ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असलेली कुलस्वामिनी रेणुका माता मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. दापोली गावातील नैसर्गिक संसाधनं ओळखून त्यातून पर्यटन विकास कसा करता येईल, यावर वैभव यांचा भर होता. त्यांनी पर्यटन, रस्ते आदी सोबतच तलावात नौकाविहार आदी प्रकल्प सुरू केले. दापोली गावाला पर्यटन क्षेत्रातून ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे बाहेरचे पर्यटक दापोली गावात येऊन दापोलीच्या अर्थकारणाला आता गती मिळणार आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातही संखे आघाडीवर आहेत. कोणाचं शिक्षण पैशाअभावी राहू नये, कोणाचं स्वप्न भंगू नये, गुणवत्ता असतानाही कुणाला क्रीडा क्षेत्रात चमकण्याची संधी मिळाली नाही असं होऊ नये, यासाठी ते सातत्यानं मदत करत असतात. ‘करमतरा कंपनी’ अशा लोकांसाठी सातत्यानं पुढं असते. उमरोळी ते दापोली रस्त्यासाठी व पुलासाठी वैभव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केलेल्या प्रयत्नांमुळं पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. चिपळूण भागात गेल्या दोन वर्षांपूर्वी महापुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. अशावेळी ‘करमतारा ग्रुप ऑफ कंपनीज’ आणि ‘कमला ग्रुप ऑफ कंपनी’च्या माध्यमातून त्यांनी तिथं जाऊन पूरग्रस्तांना मदत केली. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. चुल पेटवायची कशी असा मोठा प्रश्न निर्माण झाला. अशा संकटात सापडलेल्या कुटुंबीयांना घरघंटी, शिवण यंत्र, गॅस शेगड्या आदी साहित्याचं वाटप करून त्यांनी संबंधिताच्या घरातील चुल पेटती कशी राहील यावर लक्ष दिलं. कोरोना काळात अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळं या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत केली. चार हजार सातशे किलो तांदूळ, गहू डाळी, तेल आदी साहित्य जिल्हा प्रशासनाकडं सुपूर्द करून, त्यांच्यामार्फत हे साहित्य योग्य ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली. पालघर तालुक्यातील भोपोलीसारख्या आदिवासी दुर्गम भागात दुरून चालत येणाऱ्या विद्यार्थिनींचं कष्ट थोडं कमी करण्यासाठी अशा विद्यार्थिनींना सायकली भेट दिल्या. मच्छीमारीसाठी गेलेले केळवे येथील महादेव घोलप हे जायबंदी झाले. अपंग झाले. त्यांना तीन चाकी सायकल भेट देऊन त्यांचं चालणं-फिरणं सोपं केलं. डहाणू तालुक्यातील सोनाळे, कोदे पाडा येथे कालव्यातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांचा प्रवास सोपा करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने कालव्यावर लोखंडी पूल उभारून दिला. अशी कितीतरी कामं वैभव यांनी केली. त्यांच्या सामाजिक कार्याला आणि दातृत्वाला सलाम!