पालघर-योगेश चांदेकर
पालघर- केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळं आदिवासी समाज आजही मागासलेला आहे. त्यामुळंच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडं लक्ष वेधण्यासाठी आज नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. पालघर हा तर संपूर्ण आदिवासी जिल्हा. आदिवासींच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सांस्कृतिक चालीरीती जपण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
मूळ निवासी आदिवासी लोकांचे हक्क संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांचा अधिकार असूनही. मूळनिवासी लोकांना अनोख्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांना आजूबाजूच्या जगाकडून दुर्लक्षित केले जाते. त्यांच्या क्षेत्रात शेती, खाणकाम, पर्यटन आणि विविध विकासात्मक प्रकल्प नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच तसेच जंगलांचा मोठा भाग विकासाच्या नावाखाली नष्ट होताना दिसत आहे. जे की त्यांनी पिढ्यान पिढ्या जपून ठेवलेले आहे.संयुक्त राष्ट्र संघ द्वारा ९ ऑगस्ट १९९२ ला आदिवासींची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून जाणीव जागृती म्हणून जगातील आदिवासींचे अधिकाराचे रक्षण करण्यासाठी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो. भारतातही हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्द्ल अपार /असीम श्रद्धा, निसर्गावर असलेले अतुलनीय प्रेम, विश्वास, स्वाभिमान, सत्य, सचोटी, चिकाटी आणि प्रामाणिकपणाचा अत्युच्च कळस, या पारंपारीक गुणांचा गौरव व नैसर्गिक वारसा म्हणून “युनोने घोषणा केल्यानुसार ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो.
संयुक्त राष्ट्रानं पहिल्यांदा १९९४ हे आदिवासी लोकांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं होतं. आदिवासी समाजातील लोकांच्या भाषा, संस्कृती, सण, चालीरीती, कपडे इतर समाजातील लोकांपेक्षा वेगळे आहेत. यामुळेच हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकलेले नाहीत. अहवालानुसार, त्यांची संख्या अजूनही वेळोवेळी कमी होत आहे. आजही आदिवासी समाजातील लोकांना आपलं अस्तित्व, संस्कृती आणि सन्मान वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचं एक मुख्य कारण म्हणजे हे लोक निसर्गाच्या जवळ राहणं आणि जंगलात राहणं पसंत करतात. त्यामुळं ते मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. आज जंगलं कमी होत आहेत. त्यामुळं त्यांची संख्याही कमी होत आहे. आजही आदिवासी समाजातील लोकांचा मुख्य आहार हा झाडं-वनस्पतींशी संबंधित आहे. त्यांचे धार्मिक सण-उत्सवही निसर्गाशी संबंधित आहेत. जगभरात सुमारे पाचशे कोटी स्थानिक लोक राहतात आणि सात हजार भाषा बोलतात. जगातील २२ टक्के भूभाग व्यापतात. त्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होतं. २०१६ मध्ये २६८० आदिवासी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. म्हणूनच या भाषा आणि या समाजातील लोकांना समजण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनं २०१९ मध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याची घोषणा केली. अमेरिकेत दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी कोलंबस दिवस साजरा केला जात होता. तिथल्या आदिवासींचा असा विश्वास होता, की कोलंबस वसाहतवादी राजवटीचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. यानंतर कोलंबस दिनाऐवजी आदिवासी दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी 1982 मध्ये जीनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेत कोलंबस दिनाऐवजी आदिवासी दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली होती.
भारतात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार इत्यादी भारतातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. मध्य प्रदेशशात ४६ आदिवासी जमाती राहतात. मध्य प्रदेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी २१ टक्के लोक आदिवासी समाजाचे आहेत. त्याच वेळी, झारखंडच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे २८ टक्के आदिवासी समुदायाचे लोक आहेत. फक्त मध्य प्रदेशात गोंड, भील आणि ओरॉन, कोरकू, सहारिया आणि बैगा जमातींचे लोक मोठ्या संख्येने राहतात. गोंड हा आशियातील सर्वात मोठा आदिवासी समूह आहे, ज्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. मध्य प्रदेश व्यतिरिक्त गोंड जमातीचे लोक महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये राहतात, तर संथाल, बंजारा, बिहोर, चेरो, गोंड, हो, खोंड, लोहरा, माई पहारिया, मुंडा, ओराव इत्यादी आदिवासी समाजाचे लोक भारतातील विविध राज्यात राहतात. महाराष्ट्रात पालघर, नंदुरबार, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त आहे. नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुके ही आदिवासी बहुल आहेत. भारतात १० कोटी ४० लाख आदिवासी लोकसंख्या आहे. देशातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान आणि ओरिसा या राज्यांमध्ये राहते. भारतातील आदिवासी जमाती आणि आदिवासी लोक आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत. साहजिकच भारतीय आदिवासी जमातींची वैशिष्ट्येही लक्षणीय असून या वैशिष्ट्यांवरूनच आपल्याला त्यांची खरी ओळख पटते.
आदिवासी समाज प्रगत समाजापासून दूर आहे. त्यांना रात्रंदिवस निसर्गाच्या सानिध्यात राहावं लागतं. वर्षातील तिन्ही ऋतूंचा मोठ्या धैर्यानं सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर मुसळधार, धो-धो कोसळणारा पाऊस, विजांचा कडकडाट व डोंगराळ भाग असल्यामुळं अनेकदा नैसर्गिक आपत्ती ओढवतात. हिवाळ्यात कडाक्याची थंडी, उन्हाळ्यातील रखरखतं ऊन इत्यादींचा सामना करावा लागतो.
आदिवासींच्या गावांमध्ये मोजकीच म्हणजे ५० ते १०० घरांची वस्ती असते. वस्ती जंगलात, दऱ्याखोऱ्यात, पर्वतात असते. जंगलातून आणलेल्या काड्या, बांबू, गवत यापासून बनलेल्या घरात राहण्याची व्यवस्था असते. घरं पक्की नसतात. त्यामुळं थंडी, ऊन, पाऊस, वारा यापासून बचाव करावा लागतो. या सर्व संकटांवर मात करून आदिवासी समाज आपला उदरनिर्वाह करत असतो. भारतात आदिवासी जमातीचे लोक विशिष्ट अशा भूप्रदेशात प्रामुख्यानं अत्यंत दुर्गम भागांत राहतात. जिथं दळणवळणाची साधनं नसतात. आडवळणाचे आणि दुर्गम रस्ते, एकच पाऊलवाट, जंगळाबाहेर जाताना किंवा आपल्या वस्तीतून दुसऱ्या वस्तीत जाताना त्यांना नद्या-नाले, हिंस्त्र पशू यांचा सामना करावा लागतो. एका विशिष्ट भूप्रदेशावर या जमातींचं वास्तव्य असतं. उदा. छोटा नागपूरमधील संथाल, महाराष्ट्रातील कोरकू केवळ मेळघाटमध्येच अथवा मध्य प्रदेशातील छिंदवाडा/निमाड या भागात आदिवासी राहतात. खासी, गारो या जमाती आपापल्या भागांत आढळून येतात. ज्या भागात आदिवासी लोक राहतात, तेथील लोकसंख्या ही मर्यादित असते. एका खेड्यात/गावात साधारणतः २०० ते ३०० इतकी लोकसंख्या असते. म्हणजे मर्यादित लोकांचा समूह असतो. आधुनिक आणि प्रगत समजापासून दूर राहत असल्यामुळं व लोकसंख्या कमी असल्यामुळं आदिवासींना उपलब्ध होणारी साधनंसुद्धा मर्यादितच असतात. बाह्य जगाशी त्यांचा मर्यादित संपर्क येतो. रात्रंदिवस निसर्गाच्या सानिध्यात राहावं लागत असल्यामुळं नैसर्गिक आपत्ती त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. जेव्हा मनुष्य संकटामध्ये सापडतो, तेव्हा त्याचा सहज धर्मावर विश्वास वाढतो किंवा त्याच्यावर संकट येताच त्याला देव आठवतो. या नैसर्गिक आपत्तींचा, आजाराचा/रोगराईचा सामना करण्यासाठी देवतांची पूजा, निसर्गाची पूजा, जादूटोणा व आदिम शक्तींची पूजा जमातीत केली जाते. इतकंच नाही तर दैनंदिन जीवनातील कोणतंही कार्य करत असताना धर्माला/धार्मिक शक्तीला साक्षी ठेऊन पार पाडलं जातं. सण-उत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात; परंतु विधिपूर्वक साजरे केले जातात. आदिवासींवर धर्माचा विलक्षण प्रभाव दिसून येतो.
जंगल के सर्वश्रेठ रक्षक आदिवासी आहेत. जगातील ९० देशात ४७ करोड ६० लाख मूळ निवासी जगाच्या लोक संख्येच्या ६/७ टक्के आहेत.बोलिभाषा जवळ जवळ ७००० आहेत. तर सांस्कृतिक वैभव ५००० प्रकारचे आहे.भाषा म्हणजे एकमेकांना समजण्यासाठी एक दुवा असतो. दोन व्यक्तींमधील संभाषण भाषेमुळं होतं. भारतीय आदिवासी जमातींमध्ये त्यांची स्वतंत्र बोलीभाषा आहे. त्यांची गाणी, लोकगीतं, लोककथा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हस्तांतरित करताना भाषेचाच उपयोग केला जातो. आपली बोलीभाषा आणि त्यातील लोकसाहित्य यांचं ज्ञान व वापर दैनंदिन जीवनात दिसून येते. आदिवासींची बोलीभाषा आहे; पण अद्याप कोणत्याही जमातीची लिपी नाही. उदा. कोरकू आदिवासी ‘कोरकू’ बोली बोलतात, गोंड लोक ‘गोंडी’ बोलतात; पण त्यांची लिपी मात्र नाही. मनुष्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे अर्थव्यवस्था! यातून आदिवासी समाज सुटत नाही. परंतु आदिवासींची अर्थव्यवस्था अत्यंत साधी असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं, हाच त्यांचा अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. दैनंदिन जीवनात काबाडकष्ट करून केवळ आजच्यापुरती कमाई करायची आणि भविष्याचा कोणताही विचार न करता जे मिळेल; त्यावर चरितार्थ चालवावा, हाच प्रमुख उद्देश दिसून येतो. त्यांच्यामध्ये पैशांचा संचय दिसून येत नाही. आदिवासी लोक शिकार, जंगल वेचणं व फिरती शेती यावर निर्वाह करतात. फिरत्या शेतीला विविध भागांत ‘पेंदा/ दहिया/झूम’ अशी नावं आहेत. निसर्गातून मिळणाऱ्या संपत्तीवर आपली गुजराण करणं, प्राथमिक गरजा भागवणं व दैनंदिन जीवनात जेवढं गरजेचं आहे तेवढीच कमाई करून तिचं श्रमविभाजन केलं जातं. अर्थव्यवस्थेत स्त्री आणि पुरुष यांना समान वाटा असतो. पुरुषांनी जड व स्त्रियांनी हलकी कामं करावीत, असं श्रमविभाजन केलं जातं. अर्थव्यवस्था प्रगत नसून मागासलेली असते; परंतु नफेखोरी आदिवासींच्या अर्थव्यवस्थेत नसून सहकार्याची भावना आढळते. प्रामाणिकपणा आदिवासींच्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आज सर्वत्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरी आदिवासी यापासून कोसो मैल दूर आहेत. दैनंदिन व्यवहारात ते वापरत असलेली हत्यारं/अवजारं आजही जुनीच दिसतात. आपली झोपडी किंवा घर बांधताना तसंच शेतात काम करताना वापरण्यात येणारी साधनं/अवजारं जुनीच असतात. शेतीकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत. आजही भारतीय आदिवासी पारंपारिक पद्धतीनंच शेती करतात. विज्ञान अजूनही त्यांना अवगत नाही. भारतीय आदिवासींचं राहणीमान अत्यंत साधे आहे. साधी राहणी, साधा पोशाख, आपसातील नातेसंबंध जपण्याची पद्धत, खान-पान अत्यंत साधं आहे. विविध प्रथा, परंपरा, रीतिरिवाज व धार्मिक श्रद्धा यांचं आदिवासी काटेकोरपणे पालन करतात. कुटुंबात किंवा गावात जी वेषभूषा असते, तीच जंगलात/शेतातील काम करताना असते. आजही आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित आहे. भारत सरकारनं त्यांच्यासाठी विविध शैक्षणिक सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी दुर्गम भाग, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, यामुळे मुलांना शाळेत जाणं शक्य होत नाही. शिक्षण बोलीभाषेत नसल्यामुळं भाषेची मोठ्या प्रमाणात अडचण आहे.
जागतीक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा