शिवसेनेच्या ५९व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची भावनिक साद घातली आहे. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी मतभेद विसरून एकजूट होण्याची गरज असल्याचे अग्रलेखात ठामपणे नमूद करण्यात आले.
याचवेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या गुप्त भेटीवरही तीव्र टीका करत, मराठी एकजुटीला खीळ घालण्याचा भाजप आणि शिंदे गटाचा डाव असल्याचा आरोप ‘सामना’ने केला.
राज-उद्धव युतीच्या चर्चांना ब्रेक?
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरला होता. राज ठाकरे यांनी स्वतः अनेकदा उद्धव यांच्यासोबत युतीबाबत सकारात्मक विधाने केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील गुप्त भेट उघड झाल्याने या चर्चांना अचानक ब्रेक लागल्याचे बोलले जाऊ लागले.
भाजपच्या मुखपत्र ‘तरुण भारत’ने तर “राज-उद्धव युतीला विराम” असा मथळा झळकावला. ‘सामना’ने यावर टीकास्त्र सोडत, फडक्या पाण्यात मित्र ठेवणाऱ्या या भेटीमुळे मराठी एकजुटीत संभ्र मचवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.
‘मराठी माणूस हद्दपार’चा डाव हाणून पाडू
‘सामना’च्या अग्रलेखात शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. “शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तोडूनही सत्ताधाऱ्यांचा आत्मा शांत झाला नाही. त्यांना मुंबईसह महाराष्ट्रातून मराठी माणूस कायमचा हद्दपार करायचा आहे,” असा घणाघाती आरोप अग्रलेखात आहे.
मराठी माणसाच्या एकजुटीला खीळ घालण्यासाठी संशय आणि संभ्राम निर्माण करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचेही यात नमूद आहे. मात्र, यावर ठाकरे आणि शिवसेना ठामपणे उभे असून, मराठी बाणा कायम राखण्यासाठी एकट्याने का होईना, लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ठाकरे बंधूंची एकजूट, लोकभावनेचा उद्रेक
मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी तीव्र लोकभावना महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. ‘सामना’ने या भावनेचा उल्लेख करत, उद्धव, “मराठी एकजूटीमुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मराठी माणसाची एकजूट टिकली तर अनेकांना महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे लागेल, याची भीती त्यांना आहे.” उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा राज ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली आहे. आता ‘सामना’च्या या अग्रलेखाने ती भावना पुन्हा तीव्रपणे व्यक्त केली आहे.
शिवसेना शतायुषी होईल, लढत राहील
शिवसेनेच्या वर्धापनदिनी ‘सामना’ने आपला लढाऊ बाणा कायम ठेवताना म्हटले आहे, “शिवसेना ५९ वर्षे छाताडावर पाय रोवून उभी आहे. ती शतायुषी होईल आणि पुढेही लढत राहील. सोबत येणाऱ्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून!” मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवसेना सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असल्याचा विश्वास या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.