हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येत राज व उद्धव ठाकरे यांनी वरळीत विजयी मेळावा घेतला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांपूर्वी मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार का? याची चर्चा रंगली आहे. दोन्ही बंधू एकत्र येऊन आठ दिवस झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात राजकीयदृष्ट्या एकत्रित कधी येणार याची उत्सुकता लागली असतानाच आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट येत आहे. या आठवडाभरात या युतीबाबत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून त्यामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे व ठाकरेंच्या शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी राज ठाकरेंनी आता राजकीय कवायत सुरू केली आहे. राज ठाकरे (Raj thackeray) पदाधिकाऱ्यांच्या मनातल्या भावना जाणून घेणार आहेत. इगतपुरीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत 16 जुलैपासून मनसेचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर राज ठाकरे युतीबाबतची राजकीय भूमिका जाहीर करतील, असे समजते.
दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav thakceray) यांची सामनामधील मुलाखत 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. राज ठाकरेंच्या युतीबाबत या मुलाखतीत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याबाबत त्यांनी यापूर्वीच सकारत्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार यांची बैठक घेऊन युतीबाबतचा अहवाल मागवला आहे.
राज ठाकरे यांनी देखील याआधी महाबळेश्वरमध्ये कार्यकर्ते, समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलन आणि मोर्चे केल्यानंतर विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरेंनी एकत्र राहण्याबाबत भाष्य केले होते. आता त्यानंतर एकीकडे राज ठाकरेंच शिबिर आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची मुलाखत या दोन्ही मोठ्या घडामोडींकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चार दिवसापुर्वीच राज ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य करताना संभाळून बोला अशा सूचना मनसेच्या पदधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसेच्या नेतेमंडळीत संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे आता राज ठाकरे येत्या काळात युतीबाबत काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.