मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच समोर आला. यात ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. त्यांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.
या निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटाची गेल्या ९ वर्षांची बेस्ट पतपेढीवरील सत्ता संपुष्टात आली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. यामुळे सध्या भाजपसह महायुतीकडून ठाकरे गटावर टीका केली जात आहे. त्यातच आता शिवसेना भवन समोरील एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
बॅनरद्वारे ठाकरे बंधूंना टोला
बेस्ट पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सात जागा जिंकल्या, तर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. या विजयानंतर भाजपने आता बॅनरबाजी सुरु केली आहे. नुकतंच भाजपकडून शिवसेना भवन परिसरात एक बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर ‘ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरद्वारे ठाकरे बंधूंना टोला लगावण्यात आला आहे.
या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रविंद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच या बॅनरवर उद्धव ठाकरेंचाही एक फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या बॅनरवरुन नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. मात्र या निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे. त्यांच्यासाठी ही निकाल म्हणजे एक धोक्याची घंटा असल्याचे बोललं जात आहे.
निवडणुकीचा निकाल काय?
दरम्यान बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत हे पॅनेल उभे केले होते, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. बेस्ट पतपेढीच्या २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. तर दुसरीकडे शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा जिंकत मोठे यश मिळवले. तसेच भाजप आणि शिंदे गटाच्या ‘महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेल’ने ७ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटाची गेल्या ९ वर्षांची बेस्ट पतपेढीवरील सत्ता संपुष्टात आली आहे.
