banner 728x90

ठाकरेंना दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान; पालिका निवडणुकीआधीच महत्वपूर्ण निकाल

banner 468x60

Share This:

मागील अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात रखडलेल्या शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने थेट ऑगस्ट महिन्यात याबाबत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.

असे असले तरी कोर्टाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता वाढली आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही मागणी केली आहे.

याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांनी 2 जुलैला खंडपीठासमोर केली होती. त्यावर आज कोर्टात युक्तीवाद होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायाधीश सूर्यकांत यांनी ऑगस्ट महिन्यांत हे प्रकरणावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप त्यांनी तारीख निश्चित केलेली नाही. आजच्या सुनावणीदरम्यान सूर्यकांत यांनी ही केस आपल्याला संपवायची आहे, असे विधान केले आहे.

सुप्रीम कोर्टाकडून ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत दिल्याने उद्धव ठाकरे यांना सध्यातरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. निवडणुकीआधी संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागू शकतो. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या 2022 मधील बंडानंतर फेब्रुवारी 2023 मध्येच शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते. त्याला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून अजूनही त्यावर निकाल आलेला नाही.

banner 325x300

निवडणुकांआधी अंतरिम निकाल देण्याची मागणी ठाकरेंनी याचिकेत केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच नावावर आणि चिन्हावर लढवल्या गेल्या आहेत, असा युक्तीवाद केला आहे. सुप्रीम कोर्टाने आधीही याबाबतची ठाकरेंची याचिका फेटाळली आहे, असेही वकिलांकडून निदर्शनास आणून दिले जात आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यांत कुणाला दिलासा मिळणार, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!