दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती, तिकडे स्कोप नाही पण इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता असं त्यांनी म्हटलं होतं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.
दरम्यान त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या बैठकीमध्ये हिंदी भाषा सक्ती, भाषा त्रिसूत्र आणि विरोधी पक्षनेतेपद यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात ही बैठक झाली.
या बैठकीची चर्चा सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर विधानसभेत प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला, ठाकरेंनी काल दिलेलं पुस्कक मी वाचलं. कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होतं नाही, असं फडणवीस यांनी या बैठकीबाबत बोलताना म्हटलं आहे. दरम्यान पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरेंच्या कॅबिनेटसमोर आला होता, ठाकरेंच्या कॅबिनेटनं अहवाल स्विकारला होता, असा दावाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.
पाच जुलैरोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या भेटीनंतर महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होऊ शकते अशी जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता, यावर आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.