ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आ-वासून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी या इमारतींची यादी पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत असते.
त्यानुसार पालिकेने शहरातील धोकादायक व अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे.
शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत आहेत. त्या इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. त्यातील २६ इमारती या आजच्या घडीला व्याप्त आहेत. तसेच १५ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. १० इमारतींचे धोकादायक बांधकाम काढण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
पावसाळ्याच्या काळात धोकादायक व अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे.
सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे असे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत आहेत. त्या इमारती रिकामी करून पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे.
अतिधोकादायक इमारतींमध्ये सर्वाधिक ६३ इमारती या नौपाडा प्रभाग समितीत आहेत. तर सी-२ ए या प्रकारातही २१ इमारतींचा समावेश येथे आहे. दुसरीकडे वागळे इस्टेट भागात एक हजार ०८८ इमारती या धोकादायक असल्याची आकडेवारी दिसत आहे. त्यातही मुंब्य्रात अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती या एक हजार ३४३ एवढ्या असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यापूर्वी पालिकेकडून पावसाळा तोंडावर आल्यावर इमारत धारकांना नोटिसा बजावल्या जात होत्या. मात्र, यंदा आयुक्त सौरभ राव यांनी या इमारती रिकाम्या करून येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता अतिक्रमण विभागाने अशा व्याप्त इमारतधारकांना इमारती रिकाम्या करण्यास सांगितले आहे.