राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक बळ मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट जमा केली जाते.
त्यामुळे अनेक महिलांना घरगुती खर्च आणि स्वतःच्या गरजांसाठी मोठा आधार मिळतो. सध्या राज्य सरकारकडून सर्व लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विशेष संकेतस्थळही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र केवायसी करताना अनेक महिलांना तांत्रिक आणि पडताळणीसंबंधी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या दूर करण्यासाठी प्रशासनिक स्तरावर सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, केवायसी प्रक्रियेदरम्यान काही महिलांना विशेषतः ज्यांच्या पती किंवा वडील नाहीत, त्यांना पडताळणी करताना अडचणी येत आहेत. या बाबीचा विचार करून आता संबंधित संकेतस्थळात आवश्यक तांत्रिक बदल केले जात आहेत. हे बदल पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना कोणत्याही त्रासाशिवाय ई-केवायसी करता येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांवरही काम सुरू
त्याचबरोबर, सध्या संकेतस्थळावर वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांवरही काम सुरू आहे. अनेक महिला लॉगिन किंवा दस्तऐवज अपलोड करताना त्रास होत असल्याची तक्रार करत आहेत. या तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी विभागाकडून सुधारणा सुरू असून, लवकरच ही प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल, असेही त्या म्हणाल्या. बदल झाल्यानंतर लाभार्थींना केवायसी प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करता येईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
…याकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, केवायसीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांकडून मोठ्या प्रमाणात केवायसी प्रक्रिया सुरू आहे. मात्र तांत्रिक बदल सुरू असल्याने काहींना अद्याप प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये. त्यामुळे अनेक लाभार्थींनी केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून या मागणीचा विचार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकार प्रयत्नशील
महत्त्वाचे म्हणजे, राज्यभरातील महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दरमहा मिळणारी रक्कम ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपयोगी ठरत असून, सरकारही या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्नशील आहे. केवायसी प्रक्रियेत होणारे बदल आणि त्यानंतर येणारा दिलासा हा लाखो बहिणींसाठी निश्चितच आनंदाची बातमी ठरणार आहे.
















