पालघर – योगेश चांदेकर
पालघर: शिक्षणसंस्थेला अंधारात ठेवत ‘रयतेचा कैवारी’ या अनधिकृत डिजिटल दैनिकात कार्यकारी संपादकपद भूषविण्याचा प्रताप करणारे शिक्षक किरण लडकू गायकर यांच्याविरोधात आगाशी विरार अर्नाळा एज्युकेशन सोसायटीने कठोर भूमिका घेतली आहे. गायकर यांची ‘दुहेरी नोकरी’ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात अडसर ठरल्याने तसेच शिक्षणसंस्थेसोबतच अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरची प्रतिष्ठा धोक्यात आल्याने रविवारी, दि. 22 जानेवारी रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत संस्थेने कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गायकर यांची चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाला अहवाल पाठविण्यात येणार आहे.
निलंबित झालेले संपादक शिक्षक शाहू भारती यांच्या अनधिकृत डिजिटल दैनिकात कार्यकारी संपादक असणारे शिक्षक किरण गायकर यांनी यासाठी संस्थेची पूर्वपरवानगी घेतली नव्हती तसेच पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यांच्या या ‘दुहेरी नोकरी’मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते. दरम्यान, शिक्षणसंस्थेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. रविवारी आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक किरण गायकर यांच्या चुकीच्या कृत्याचे कोणतेही समर्थन न करण्याचा एकमुखी निर्णय कार्यकारिणीने घेतला. तसेच शिक्षणसंस्थेच्या सचिवांकडून नोटीस बजावून गायकर यांची चौकशी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
शिक्षणसंस्थेची प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्या या प्रकरणात कार्यकारिणीने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आता सचिवांकडून शिक्षक गायकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर चौकशीचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविला जाणार आहे.

कारवाईच्या निर्णयामुळे पालकांना मिळणार दिलासा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी शिक्षणसंस्थेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शिक्षक गायकर यांच्यावर कठोर कारवाईसाठी पाऊले उचलली आहेत. विशेष म्हणजे शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. वादापासून नेहमीच अलिप्त राहिलेल्या शिक्षणसंस्थेने या प्रकरणात कठोर कारवाईचा हा निर्णय घेतल्याने पालकांनाही दिलासा मिळणार आहे.
अनियंत्रित ‘दुहेरी टोळी’वर कारवाईची अपेक्षा
जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच शिक्षणसंस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवेत असतानाही पत्रकारितेची हौस भागविण्याच्या नादात अनेकांनी सेवाशर्तींची पायमल्ली केली आहे. शाहू भारती यांच्या दैनिकासोबतच इतर प्रकारची ‘दुहेरी नोकरी’करणाऱ्या शिक्षकांच्या ‘दुहेरी टोळी’वर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. याबाबत दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासन तसेच संबंधित शिक्षणसंस्थांनी अशा शिक्षकांची ‘झाडाझडती’ घेऊन कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.
अनेक शिक्षकांना शिक्षणसंस्थांचे अभय
पत्रकारिताच नव्हे तर इतरही व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांपैकी अनेकांना प्रशासन तसेच संबंधित शिक्षणसंस्थांकडून अभय प्राप्त असल्याचे वास्तव आहे. शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त हे शिक्षक काय करतात, याची प्रशासनालाही माहिती आहे. तसेच खासगी शिक्षणसंस्थांनाही आपल्या अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या ‘दुहेरी नोकरी’बाबत माहिती आहे. मात्र, प्रशासनातील अधिकारी तसेच शिक्षणसंस्था त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यातच आपल्या पाल्याचे नुकसान होऊ नये यासाठी पालकांकडूनही मौन पत्करण्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य पायदळी तुडविण्याचे या शिक्षकांचे धाडस वाढल्याचे दिसत आहे. या शिक्षकांना लगाम कोण घालणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे.