पालघर- योगेश चांदेकर
पालघर: शासनाचे नियम धाब्यावर बसवून ‘रयतेचा कैवारी’ हे डिजिटल दैनिक चालविल्याने निलंबित झालेल्या संपादक शिक्षक शाहू भारतीच्या या पत्रकारितेच्या ‘शाळेतील’ कार्यकारी संपादक किरण लडकू गायकर हेसुद्धा एका प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थेच्या शाळेत शिक्षकपदी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पत्रकारितेच्या ग्लॅमरची भुरळ पडल्याने त्यांनी शिक्षणसंस्थेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेताच शाहू भारतींच्या अनधिकृत दैनिकात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निलंबित शिक्षक संपादक शाहू भारती यांनी आपल्या दैनिकासाठी राज्यभरात प्रतिनिधी नियुक्त केले होते. त्यामध्ये अनेकजण शिक्षक किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. शाहू भारती यांनी या माध्यमातून शिक्षक पत्रकारांची ‘शाळा’ नव्हे, तर एकप्रकारे ‘टोळी’च तयार केली होती, हे यापूर्वीच उघड झाले आहे. भारती यांच्या दैनिकात कार्यकारी संपादकपदाची महत्त्वाची जबाबदारीही विरारमधील एका प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थेत शिक्षकपदी कार्यरत असलेले शिक्षक किरण गायकर यांच्याकडे होती. या दैनिकात काम करण्यासाठी त्यांनी शिक्षणसंस्थेची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे आता समोर आले आहे. जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी गायकर यांनी भारती यांच्या दैनिकासाठी काम केले. या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे आपल्या शिक्षणसंस्थेला अंधारात ठेवून भारती यांची पत्रकारितेची ‘शाळा’ प्रकाशझोतात आणण्यावर भर दिला.
आता लक्ष शिक्षणसंस्थेच्या भूमिकेकडे
शाहू भारती यांच्या दैनिकाच्या माध्यमातून पत्रकारितेचा ‘जोडधंदा’ करण्याच्या नादात अनेक शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले असल्याचे दिसून येत आहे. गायकर यांनी असाच प्रकार केल्याने शिक्षणसंस्थेच्या प्रतिष्ठेला तडा गेला असून, संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थेकडून गायकर यांच्याबाबत काय भूमिका घेतली जाणार, याकडे पालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अशा शिक्षकांचा ‘आदर्श’ कसा?
शाहू भारतींच्या दैनिकासाठी काम करणाऱ्या किरण गायकर यांना एका संस्थेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला आहे. त्यामुळे अध्यापनकार्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर क्षेत्रात सक्रीय असलेल्या शिक्षकांनाच विविध संस्थांकडून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ कसा मिळतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शिक्षणक्षेत्रासह पालकांमध्ये नाराजी
शाहू भारतींच्या निलंबनानंतर आता त्यांच्या माध्यमातून पत्रकारितेचे ‘व्रत’ स्वीकारलेल्या शिक्षकांची माहिती आता हळूहळू समोर येत आहे. शिक्षकी पेशाला पूर्णपणे न्याय न देता, असे ‘जोडधंदे’ करणाऱ्या शिक्षकांबद्दल आता शिक्षणक्षेत्रातूनच नाराजी व्यक्त केली जात आहे. यासोबतच आपल्या पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात घालणाऱ्या या शिक्षकांबद्दल पालकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.