पालघर-योगेश चांदेकर
पालघरः मानव विकास शिबिराच्या आयोजनासाठी येणाऱ्या निधीला पाय फुटल्याचे प्रकरण ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणल्यानंतर आता डहाणू तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणखी काही प्रताप उघडकीस आले आहेत. वाहन चालकांना मिळणाऱ्या पैशातून कमिशनची मागणी करणे तसेच रात्रपाळीच्या वेळी संबंधित चालकांना त्यांच्याच पैशातून मद्य आणायला भाग पाडणे असे प्रकार घडत आहेत. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
डहाणू तालुक्यातील आशागड, ऐना, गंजाड तसेच अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गैरप्रकार उघडकीस आले होते. ‘लक्षवेधी’ने यावर प्रकाश टाकला. मानव विकास शिबिराच्या आयोजनासाठी स्वयंसेवी संस्थांना येणारे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा न करता उपसरपंचाच्या भावाच्या नावावर तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात आले. त्यात सुमारे साडे पंधरा लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
चौकशीचे आदेश
या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. असे असतानाच आता डहाणू तालुक्यातील आशागड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा संगनमताचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
आपत्कालीन वाहनाच्या भाड्यातून कमिशन
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका किंवा अन्य वाहन उपलब्ध नसेल, तर बाहेरचे खासगी वाहन भाड्याने घेण्याची परवानगी असते. मानव विकास शिबीर, नसबंदी शस्त्रक्रिया तसेच प्रासंगिक वेळी रुग्ण सोडण्यासाठी अशी खासगी वाहने बोलावली जातात. आशागड आणि अन्य ठिकाणी किरण लखमा डोंगरकर यांची इको व्हॅन २०१६ पासून बोलवली जात आहे. पूर्वी कधीही या वाहनाचे बील काढण्यासाठी पैसे मागितले जात नव्हते; परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय गडग हे आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले, तेव्हापासून बील काढण्यासाठी कमिशन द्यावे लागते, असे किरण डोंगरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे नाव
डॉ. गडग यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांना वीस टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगून वारंवार आपल्याकडून आतापर्यंत सुमारे अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप वाहन चालक किरण डोंगरकर यांनी केला असून त्यांच्या स्वतःच्या खात्यातून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खात्यावर जी रक्कम जमा केली, त्याचे तपशील ही त्यांनी दिले आहेत. बिलाबाबत विचारणा करता कमिशन मिळाल्याशिवाय बिले निघत नाहीत आणि बील जमा केले, की लगेच फोन करून कमिशनची मागणी केली जाते असे किरण यांनी सदर अर्जात म्हटले आहे.
कमिशन दिले, तरच वाहन
आपल्याकडे उपजीविकेसाठी वाहन चालविणे हा एकमेव व्यवसाय असून त्यासाठी वाहन चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणही डॉ.अक्षय गडग यांनी सांगितलेल्या प्रत्येक वेळी त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले; याशिवाय रात्रपाळीची ड्युटी असताना ते कायम माझ्याकडून मद्य मागवून घेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्वार्टरमध्ये रात्री त्यांचे मद्यपान चालत असे, असा आरोप संबंधित चालक किरण डोंगरकर यांनी केला असून आता या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.