पालघर-योगेश चांदेकर
मानधनाभावी वृद्ध कलावंतांची ससेहोलपट
प्रशासनाकडून वृद्ध कलावंतांच्या पेंशन अर्जांना केराची टोपली
पालघरः राज्य सरकारने वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ केली असून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे; परंतु जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून मानधनाचे अर्ज प्रलंबित आहेत. मानधन मंजुरी करण्यासाठी समितीच नसल्याचे उघड झाले आहे.
राज्य सरकारने वृद्ध कलावंतांना दरमहा ठराविक रक्कम देऊन त्यांचे जगणे थोडे तरी सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत समिती स्थापन करण्याचे सरकारचे आदेश आहेत. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून त्यांचे प्रस्ताव मंजूर करणे अपेक्षित आहे. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत, साहित्यिकांना दरमहा त्यांच्या बँक खात्यावर मानधनाची रक्कम अदा केली जाते.
६३ कलावंतांना मानधन
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात दहा, मोखाडा आठ, पालघर एक, वसई २५ विक्रमगड एक आणि वाडा १८ अशा अशा ६३ जणांना वृद्ध कलावंतांचे मानधन मंजूर आहे. दरवर्षी वृद्ध कलावंतांच्या मानधनाचे प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मागवून ते मंजूर करायला हवेत. त्यासाठी वृद्ध कलावंतांपर्यंत ही माहिती पोहोचवणे आवश्यक आहे; परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा प्रकारची माहिती वृद्ध कलावंतापर्यंत पोहोचवलेली नाही. त्यामुळे एक तर पालघर जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचे फारसे प्रस्ताव येत नाहीत आणि त्यांनी प्रस्ताव दाखल केले, त्यांचे प्रस्ताव समितीच नसल्याने मंजूर होत नाहीत.
वर्षभरापासून २५ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
गेल्या वर्षभरात असे सुमारे २५ प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित आहेत. राज्य सरकारने ही योजना जिल्हा परिषदेकडे सोपवली आहे. मानधनाच्या रकमेतही वाढ केली आहे. अ वर्ग कलावंतांना दरवर्षी १६ हजार आठशे रुपये, ब वर्ग कलांचा कलावंतांना दरवर्षी १४ हजार चारशे रुपये, तर क वर्ग कलावंतांना वार्षिक १२ हजार रुपये मानधन देण्यात येते. राज्य सरकारने या कलावंतांचे मानधन मंजुरीचे प्रस्ताव कसे मंजूर करावेत, यासाठी नियमावली ठरवली आहे तसेच मानधनाबाबतचा अर्जही तयार करून दिला आहे.
मानधनाचे निकष
वृद्ध कलावंतांचे मानधन आणि त्याचे प्रकार त्यासाठी काही निकष ठरवले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील वृद्ध साहित्यिक कलाकार व कलावंतांचा समावेश अ वर्गात, राज्य पातळी वृद्ध साहित्य व कलावंताचा ब वर्गात तर जिल्हा पातळी वृद्ध साहित्यिक व कलावंताचा समावेश क वर्गात करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर वृद्ध साहित्य व कलावंतांचे प्रमाण साठ टक्के, राज्य पातळी वृद्ध साहित्य व कलावंताचे प्रमाण तीस टक्के तर राष्ट्रीय पातळीवरील वृद्ध साहित्यिक व कलावंताचे प्रमाण दहा टक्के अशी प्रस्ताव मंजुरीची अट आहे
समिती नसल्याने काम ठप्प
पालघर जिल्ह्यात मात्र याबाबत समितीच नसल्याने प्रस्ताव मंजूर होत नाहीत. या प्रस्तावांची माहिती वृद्ध कलावंतक, साहित्यिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने फारसे कष्ट घेतले नसल्याचे दिसून येत नाही. वृद्ध कलावंतांनी तशा तक्रारी केल्या आहेत. त्यातच जिल्हा परिषदेकडे प्रस्तावही मंजूर होत नसल्याने वृद्ध कलावंत व साहित्यिकांत संताप व्यक्त होत आहे.
मी गेली पंचावन्न वर्षांपासून नाट्यक्षेत्रात अभिनेता दिग्दर्शक म्हणून ग्रामीण भागातून काम करत आहे वृद्ध कलावंताना जे मानधन मिळते त्यासाठी सर्व विभागातील प्रशासकीय कार्यालयात गेली अडीच वर्षांपासून खेटे घालत आहेत. याबाबत सर्व कागदपत्रे सादर केली असतांना सुद्धा माझ्या कुठल्याही पाठपुराव्याला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही याबद्दल अतिशय खेद वाटतो आहे वृद्धकलावंतांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भरत दुशंत जगताप जेष्ठ नाट्य अभिनेता, तथा दिग्दर्शक