पालघर-योगेश चांदेकर
पालघरच्या स.तू. कदम विद्यालयाला ‘मुख्यमंत्री माझी शाळा योजने’त दुसरा पुरस्कार
१५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पालघरः ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा दोन’ या योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबई विभागातील सहा जिल्ह्यांतून पालघर जिल्ह्यातील स. तु. कदम माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयास दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
खासगी शाळा गट विभागातून मिळालेला हा पुरस्कार जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, मुख्याध्यापक संगीता गायकवाड यांना मुंबईतील एनसीपी सेंटर येथे प्रदान करण्यात आला. १५ लाख रुपयांचा धनादेश व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे होते उपस्थित
हा पुरस्कार स्वीकारताना पालघरच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत, डाएट समन्वयक तानाजी डावरे, केंद्रप्रमुख महेश पिंपळे, ‘सीबीएससी स्कूल’च्या व्यवस्थापक कोमल कदम, उपमुख्याध्यापक मनीषा तारवी, प्रकल्प प्रमुख गणेश प्रधान, प्रा. तुषार बाविस्कर, शुभांगी पाटील, प्रीतम घरत आदी उपस्थित होते.
विद्यार्थीपूरक बदल घडवण्यास योजना उपयुक्त
पुरस्कार वितरण करताना मुख्यमंत्री म्हणाले, की शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यालादेखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत. शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले आहे. शाळा हा आपल्या आयुष्यातील हळुवार कोपरा असतो. शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. शाळा ही आयुष्यातील ज्ञान मंदिर असते. शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते. आईवडील जन्म देतात, तर शिक्षक हे आयुष्य घडवतात. विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवण्यासाठी मोठे योगदान देतात. त्यामुळे गुरूजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे शिंदे म्हणाले.
दोन कोटी विद्यार्थी सहभागी
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’ हे अभियान ४५ दिवसांमध्ये राबविण्यात आले. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी १५० गुण देण्यात आले होते. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’ २९ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत राबविण्यात आले. या उपक्रमात सुमारे ९८ हजार शाळांमधील एक कोटी ९१ लाख विद्यार्थी आणि सहा लाख ६० हजार शिक्षक सहभागी झाले होते.
स. तु. कदम विद्यालयाच्या तीस उपक्रमांची दखल
स. तु. कदम विद्यालयाने आपल्या शाळेत परसबाग, शालेय डिजिटल विज्ञान बाग, हॉर्स रायडिंग क्लब, इको क्लब, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ई-लायब्ररी, इनोव्हेशन लॅब (आयओटी रोबोटिक थ्री डी प्रिंटिंग) आनंददायी शनिवार (बॅगलेस स्कूल डे), स्काऊट गाईड, भूगोल प्रयोगशाळा, प्रत्येक वर्गात वाचन कोपरा, प्रत्येक वर्गात विद्यार्थी लॉकर, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, मुलींसाठी पिंक रूम, तंबाखूमुक्त शाळा, शालेय व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, शालेय विद्यार्थी बँक, कला-क्रीडा मंडळ, पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई व आरो प्लांट, शालेय लेझीम पथक, क्रीडा दालन, कलादालन, विद्यार्थी प्रथमोपचार कक्ष, प्रत्येक वर्गात ई लर्निंग सुविधा, अग्नि सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, विद्यार्थी मदतीचा हात उपक्रम, सुसज्ज व्यायाम शाळा, असे तीस उपक्रम राबवले जात आहेत.
‘आमची शाळा ही उपक्रमशील शाळा आहे. या शाळेत शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण काम केल्याचे एक वेगळे समाधान या पुरस्कारामुळे मिळाले आहे.
–नम्रता राऊत, शिक्षक

‘आमच्या शाळेत बॅगलेस सॅटर्डे हा उपक्रम राबवला जातो, त्या दिवशी आम्ही शाळेत दप्तर न घेता जातो. त्या दिवशी आमचे विविध खेळ, नृत्य आणि वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यामुळे शाळेत जायला आवडते.
–निकिता पाटील,विद्यार्थिनी,