पालघर-योगेश चांदेकर
पालघर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार
पालघरः पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे देशातील पूर्व भागाशी जोडण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला इगतपुरी तालुक्यातील घोटीवरून जव्हार, मोखाडा मार्गे वाढवण बंदराशी जोडण्याचा मार्ग मंजूर झाला आहे. या मार्गाला जव्हार इंटरचेंज काढण्याबाबत कॅप्टन विनीत मुकणे यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. हे स्वप्न नुकतेच प्रत्यक्षात आले आहे. मुंबई-नागपूर हा राज्यातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग आहे. हा महामार्ग थेट पूर्व भारताशी आणि मध्य भारताची जोडणारा असल्याने राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. आता वाढवण हे जगातील दहा बंदरापैकी एक बंदर होणार असून या बंदराशी जोडणारा समृद्धी महामार्ग आता तयार होणार आहे.
पालघर जिल्हा मध्य आणि पूर्व भारताशी जोडला जाणार
या समृद्धी महामार्गाला इगतपुरी तालुक्यातून इंटरचेंज काढण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर पर्यंतच्या रस्ता अतिशय चांगला होणार असून त्यामुळे दळणवळण गतिमान होणार आहे त्याचबरोबर वाढवण बंदरातून येणारा आयात वस्तू या रस्त्याने अन्य ठिकाणी पोहोचवता येईल तसेच महाराष्ट्रातील नागपूरपासून ठाण्यापर्यंतचे अनेक जिल्हे वाढवण बंदराचा शेतीमाल तसेच अन्य उत्पादन निर्यात करू शकतात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढवण बंदराकडे जाणाऱ्या महामार्गाला मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी कॅ. मुकणे यांच्या मागणीला मान्यता
या महामार्गाला जव्हार इंटरचेंज काढण्याचे मागणी कॅप्टन विनीत मुकणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे २७ फेब्रुवारी रोजी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. समृद्धी महामार्ग जव्हार-मोखाडा तालुक्यातून जातो. जव्हार व मोखाडा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागांना थेट समृद्धी महामार्गाची संपर्क करणे सोपे झाले आहे. या महामार्गामुळे पालघर जिल्ह्याच्या आरोग्य शिक्षण व पर्यटनाच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर आदिवासी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर व संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाला समृद्धी महामार्गाची थेट जोडणी मिळणार आहे. जव्हार तालुक्यातील आपटाळे व चंद्रपूर या दोन गावांतून हे इंटरचेज काढले जाणार आहे.
समाजाभिमुख किंगमेकर
कॅप्टन मुकणे हे सातत्याने पालघर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित मुद्दे मुख्यमंत्री व प्रशासनाकडे मांडत असतात. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ते जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम भागात विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. मंत्रालयात मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून ते नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत असून त्यांची प्रश्न सोडवण्याची तळमळ लक्षात घेऊन मुख्यमंत्री व प्रशासनही त्यांच्या मागण्यांना तातडीने मान्यता देत असते.
कोट
‘समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे. वाढवण बंदर हे केवळ पालघरच्या विकासाला हातभार लावणार नसून ते संपूर्ण राज्याच्या विकासाला हातभार लावणार आहे. या वाढवण बंदरातून समृद्धी महामार्गाने देशाच्या अनेक भागाशी जोडले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने आता पालघरच्या पूर्व भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.
कॅप्टन विनीत मुकणे, सामाजिक कार्यकर्ते, पालघर