रेल्वे प्रशासनाने स्थानकांतील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी फलाटांवरील दुकाने दुसऱ्या टोकाला नेण्याचा निर्णय घेतला. परंतु अजूनही मोक्याच्या ठिकाणांची दुकाने कायम असल्याने या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा प्रवाशांना झाला का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रमुख गर्दीच्या स्थानकांवरील स्थिती पाहता या निर्णयाची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नसल्याचे पाहायला मिळत आहे.
२९ सप्टेंबर २०१७ ला तत्कालीन एलफिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू, तर ३९ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर स्थानकांतील गर्दी व्यवस्थापनासाठी उपाययोजनांचा विचार सुरू झाला. याचाच भाग म्हणून आता फलाटांवरील दुकाने एका टोकाला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रभादेवी स्थानकातील दुकाने हटविण्यात येणार आहेत. मात्र, महिना उलटूनही काही दुकाने फक्त झाकून ठेवलेली आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा अपेक्षित फायदा होत नाही. दादर स्थानकातील फलाट क्रमांक १ वर एका बाजूला एक अशी दोन खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. तसेच स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांच्या गर्दीतून प्रवाशांना वाट काढत स्थानकात ये-जा करावी लागते.
फलाटांवरील कामांमुळे उभे राहणे अवघड
१. मालाड, कांदिवली आणि लोअर परळ स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी सुशोभीकरण आणि पुनर्रचना कामे सुरू आहेत.
२. मात्र, ही कामे अद्याप अपूर्ण असल्यामुळे प्रवाशांना फलाटांवर उभे राहणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या सुधारणा केवळ दिखाऊ असल्याची टीका प्रवाशांकडून होत आहे.
मध्य रेल्वेने आतापर्यंत ३० दुकाने हलविली
१. मध्य रेल्वेने सात स्थानकांवरील ३० दुकाने फलाटांच्या टोकाला हलविली आहेत. मात्र, प्रवाशांच्या मते, या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा कमीच झाला आहे. फलाटांच्या मध्यभागी होणारी गर्दी कायम आहे.
२. फलाटांवरील जागा अपुरी असल्यामुळे चेंगराचेंगरीचा धोका आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध योजना राबवत आहे. काही स्थानकांवर त्याची सुधारणा दिसत असली तरी अर्धवट कामांमुळे अपेक्षित परिणाम साधला गेलेला नाही.
अंमलबजावणी अद्याप अपूर्ण
- फलाटांवर मध्यभागी असलेली दुकाने एका टोकाला नेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी अपूर्ण आहे. काही ठिकाणी दुकाने हलविलेली नाहीत. तर काही ठिकाणी त्यांचे व्यवस्थित पुनर्वसन केले गेलेले नाही.
- स्थानकांवर विविध सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्पुरता त्रास सहन करावा लागत आहे.
- फलाटांवरील जागा अपुरी असल्यामुळे गर्दीच्या ताणाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ठोस उपयायोजनांची गरज व्यक्त होत आहे.
फलाटांवरील स्टॉल, कॅन्टीन हलविण्याचा निर्णय चांगला आहे; पण स्टॉल हलविल्यानंतर रिकामी झालेली जागा फलाटाच्या समपातळीत आणणे गरजेचे आहे, तरच प्रवाशांना तेथे नीट उभे राहता येईल. फलाटांवरील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने रेल्वेला करता यायला हवे. रेल्वेने अशा उपाययोजना हाती घेताना त्याची कल्पना प्रवाशांना द्यावी. रेल्वेच्या अशा निर्णयाला विरोध नाही; पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी.डॉ. रसिका वैद्य, प्रवासी
– डॉ. रसिका वैद्य, प्रवासी
फलाटांवरील दुकाने हलविण्याचा रेल्वेचा निर्णय स्वागताहार्य असला तरी प्रवाशांना त्याच हवा तास फायदा होत नाही. कुर्लासारख्या स्थानकाची अवस्था वाईट आहे. प्रशासनाने फलाटांवरील दुकाने स्थलांतरित करून त्यांच्यासाठी एखादे फूडकोर्ट तयार करणे आवश्यक आहे. गाड्यांचे आणि फलाटांची लांबी वाढवत असली तरी रुंदी तशीच राहते. त्यामुळे रेल्वेने सर्व खाद्यपदार्थांची दुकाने तसेच तिकीटघर डेकवर नेणे आवश्यक आहे.
– केतन शाह, झेडआरयुसीसी