राज्यातील बहुतांश भागांतील मोठ्या पावसाचा जोर मंगळवार, दि. 29 जुलैपासून कमी होत आहे. मात्र पुणे, सातारा घाटमाथ्यावर 29 आणि 30 जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर विदर्भात 29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे.
उत्तर भारतात पावसाचे धुमशान सुरूच असून, आगामी चार ते पाच दिवस राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पाऊस मंगळवारपासून विश्रांती घेत असून, फक्त पुणे आणि सातारा घाटमाथ्याला 29 आणि 30 रोजी मुसळधारेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात मात्र पावसाचा जोर सुरू राहणार असून, त्या भागात 29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे.
यलो अलर्ट (दि.29 जुलै ते 1 ऑगस्ट)
पुणे आणि सातारा घाटमाथा (29 जुलै , 30 जुलै ),अकोला (30 जुलै ), अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, (29 जुलै ते 1ऑगस्ट), बुलडाणा (30 जुलै ), वर्धा (29,30 जुलै ), वाशिम (30 जुलै ), यवतमाळ (30 जुलै )