वज्रेश्वरी- दिपक देशमुख
आगरी कोळी बांधवांची कुलदेवता वज्रेश्वरीची वज्राई माता…!
वज्रेश्वरी- संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले आणि तमाम आगरी कोळी बांधवांची कुलदेवी असलेली ठाणे जिल्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी हे वज्रेश्वरी,कालिका,रेणुका ह्या तीन देवींच्या पेशवेकालीन मंदिराने आणि औषधी गुणधर्म असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाने प्रसिद्ध आहे.वज्रेश्वरी देवी हि सर्व महाराष्ट्रातील आगरी,कोळी,कुणबी आणि गुजरात राज्यातील सुरत,वापी येथील पारशर गोत्र असल्याची कुलदेवता आहे.नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या ह्या देवी मंदिरात वर्षभर भक्तांची मोठी मांदियाळी असते,ह्या मंदिरात शारदीय आणि वासंतिक नवरात्र साजरी केली जाते आणि ह्यावेळी अकलोलीतील पवित्र गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून देवीचे दर्शन करण्यासाठी देवी भक्तांची मोठी गर्दी होत असते.
नवरात्रीमध्ये देवीला अभिषेक होऊन घटस्थापना होऊन पाचव्या दिवशी ललिता पंचमीला देवीचा फुलोरा असतो तर दसऱ्याच्या दिवशी देवीचे मुख्य आकर्षण असलेला पालखी सोहळा संपन्न होणार आहे.या दिवशी दुपारी चार वाजता देवीची पालखी मुख्य मंदिरातून निघून गावातील सीमेवर जाऊन तिथे सीमोल्लंघन सोहळा पार पडणार पडतो.यावेळी पालखी मंदिरात जाताना गावातील ग्रामस्थ महिला आरती ओवाळून पालखीची पूजा करतात आणि सात वाजता पालखी मंदिरात जाऊन रात्री संस्थानचे वंश परंपरागत विश्वस्त दरबार घेऊन ग्रामस्थांना पान सुपारी देऊन नवरात्र उत्सव संपन्न होतो.
सदर नवरात्र उत्सवासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर प्रशासन आणि गणेशपुरी पोलीस ठाणे यांनी नियोजन केले आहे.

देवीचा पौराणिक इतिहास
वज्रेश्वरी देवीची पौराणिक कथा मोठी चित्तवेधक आहे,देवीबद्दल अशी आख्यायिका आहे की,त्रेतायुगात कालिकात व सिंहमार हे दोन दैत्य उन्मत्त बनले होते,या असुरांनी भूतलावर मोठा धुमाकूळ घातला होता या असुरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी व त्यांचा नाश करण्यासाठी सर्व देवी देवतांनी व ऋषी मुनींनी वशिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली या ठिकाणी त्रिचंडी यज्ञ करण्याचे योजिले आणि याठिकाणी गरम पाण्याचे कुंडे निर्माण केली.या यज्ञाकरिता इंद्रदेवांना आमंत्रण न दिल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि आपल्यावर वर्चस्व स्थापण्याचा हा देवांचा व वसिष्ठाचा डाव आहे असे समजून इंद्रदेवाने सदर त्रिचंडी यज्ञावर व वशिष्ठावर महाभयंकर असे वज्र सोडले या वज्रामुळे यज्ञाच्या ठिकाणी प्रलयंकारी वातावरण निर्माण झाले,तेव्हा उपस्थित भयभीत झालेल्यानी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेची आळवणी सुरु केली तेव्हा पार्वती मातेने इंद्राने फेकलेले महाभयंकर वज्र पडण्यापूर्वी गिळून टाकले व दोन्ही असुरांचा वध केला आणि यज्ञ यथासांग पार पडला तेव्हापासून देवी या ठिकाणी वज्र गिळले म्हणून वज्रेश्वरी हे नाव धारण करून भक्तांच्या रक्षणासाठी, कल्याणाकरिता कालिका व रेणुका या देवींसह वास्तव्यास आहे.

देवी मंदिराची ऐतिहासिक माहिती
देवीचे मंदिर भव्य आणि किल्लेवजा आहे आणि त्यालाही ऐतिहासिक कथा आहे पेशवेकाळात चिमाजी आप्पा जेव्हा वसईच्या स्वारीवर निघाले तेव्हा या ठिकाणी त्यांनी देवीला नवस केला की जर मी वसई सर केली तर तुझे मंदिर किल्ल्यासारखे बांधेंन तेव्हा देवीच्या आशीर्वादाने चिमाजी आप्पानी मोहीम यशस्वी केली आणि देवीचे भव्य असे किल्यासारखे मंदिर बांधले आणि देवीच्या दैनंदिन पूजा अर्चासाठी परिसरातील सात गावे इनाम म्हणून दिली.अश्या ह्या वज्रेश्वरी तीर्थक्षेत्री येऊन पवित्र अश्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून ह्या तीन देवींच्या दर्शनाने जन्माचे सार्थक होते अशी भक्तांची भावना आहे.


















