banner 728x90

तोंडाशी आलेला घास हिरावला, नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार, बळीराजाची चिंता वाढली

banner 468x60

Share This:

नांदेड जिल्हा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत असून, हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. किनवट तालुक्यात आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.

या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

रब्बी पिके संकटात

रविवारी रात्री १० वाजताही पावसाने तडाखा दिला होता. त्यानंतप पावसाने सोमवारीही सायंकाळी ४ वाजता अधिक जोरासह परत हजेरी लावली. सध्या किनवट तालुक्यात हरभरा काढणीचा हंगाम ऐन जोमात आहे, तर गहू, ज्वारी आणि मका ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळी झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्यासोबतच, शेतात कापून ठेवलेला हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आता २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
कृषी विभागाने दिला इशारा

गारपीट झाल्यास हरभऱ्याचे घाटे झडण्याची आणि ओलाव्यामुळे गव्हाचे दाणे काळवंडण्याची शक्यता आहे. वाढीच्या टप्प्यातील मका पिकात पाणी साचल्यास खोड आडवे पडणे आणि पिकांवरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना आता निसर्गाच्या कोपामुळे पिकांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर परिणाम होणार हे निश्चित मानले जात आहे.
प्रशासनाचे आवाहन

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काढलेला शेतमाल सुरक्षित स्थळी हलविणे, ताडपत्रीचा वापर करणे आणि तातडीने काढणी पूर्ण करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, समाजमाध्यमांवरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान अंदाजाचे पालन करण्याचे सुचविले आहे.

वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे हवामान अजूनही अस्थिर आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता किनवट तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून जोर धरत आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!