पालघर-योगेश चांदेकर
आदिवासींचा निधी आदिवासींसाठी वापरण्याचा आग्रह
पालघरः आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झीरवाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आदिवासी आमदार राजेंद्र गावित, भीमराव केराम, राजू तोडसाम, आमश्या पाडवी, नितीन पवार तसेच आदिवासी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आदिवासींच्या विविध समस्या संदर्भात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यांच्यांशी चर्चा करताना आदिवासींसाठी असलेला निधी आदिवासींसाठीच खर्च करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, असा आग्रह धरला.
या वेळी ‘पेसा’ भागाच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीतील विसंगती दूर करून लोकसंख्येच्या आधारावर १७ सर्वांगातील भरती पूर्ण करावी, ज्या भागात ५० टक्क्यांहून अधिक आदिवासी लोकसंख्या आहे, त्याठिकाणी पेसा नियमानुसार भरती, तर इतर ठिकाणी आदिवासी व बिगर आदिवासींची पदभरती करावी, अवैध जात प्रमाणपत्र रोखण्यासंदर्भात कायदा करावा, आदिवासी विद्यापीठासाठी मुंबई व पुणे या परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या राज्यपालांकडे करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
आरक्षणाचा लाभ आदिवासींनाच मिळावा, बोगस आदिवासी प्रमाणपत्रधारकांवर कारवाई करावी तसेच ‘पेसा’ भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून ‘पेसा’ भागात आदिवासी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या भागाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.
आदिवासी संघटना, आमदार, स्वयंसेवी संस्थांची एकत्रित बैठक
राज्यपाल हे राज्यातील आदिवासी भागाचे पालक असल्याने त्यांनी राज्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधीची बैठक घ्यावी अशी विनंती या वेळी करण्यात आली. आमदार गावित यांनी आदिवासी बिगर आदिवासी जमिनीचे होणारे हस्तांतरण थांबवण्याबाबत चर्चा केली.