banner 728x90

डहाणूमध्ये निकोले-मेढा यांच्यात दुरंगी लढत डाव्या आणि उजव्या विचारांचा संघर्ष मतविभागणी कोणाच्या पथ्थ्यावर?

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः डहाणू विधानसभा मतदारसंघात या वेळी माकपचे उमेदवार आमदार विनोद निकोले आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद मेढा यांच्यात सरळ लढत होत आहे. वाढवण बंदर ज्या तालुक्यात होत आहे, त्या डहाणू तालुक्यातील ही लढत अतिशय महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे.

banner 325x300

डहाणू विधानसभा मतदारसंघ हा गुजरातच्या सीमेला लागून आहे. या आदिवासीबहुल मतदारसंघात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत निकोले आणि मेढा यांच्यात होणार आहे. गेल्या वेळी निकोले यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांचा चार हजार ७०१ इतक्या अत्यल्प मतांनी पराभव केला. त्या वेळी निकोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, तर धनारे यांना शिवसेनेचा पाठिंबा होता. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. या पक्षातील फूट आणि मतविभागणी  कुणाच्या पथ्थ्यावर पडते, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.

निकोले यांच्या कामाची छाप
गेल्या पाच वर्षात निकोले यांनी मतदार संघाची अतिशय चांगली बांधणी केली आहे. त्यात राज्यात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या सात आमदारांत त्यांचा समावेश होतो. आमदार झाल्यानंतरही अतिशय साध्या पद्धतीची राहणी आणि संपत्तीत कोणतीही वाढ न झालेला अपवादत्मक आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. राज्यात सर्वात अगोदर निकोले यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. याउलट धनारे यांच्या निधनानंतर भाजपने या मतदारसंघात  बांधणी केली असली तरी निवडणुकीच्या ऐन टप्प्यावर मेढा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली.

कुणीचे कुठे ताकद?
या मतदारसंघात कल्पेश भावर, बहुजन विकास आघाडीचे सुरेश पाडवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय वाडिया, बहुजन समाज पक्षाचे संतोष ठाकरे, वसंत बसरा, मीना भड आदी उमेदवार रिंगणात असले, तरी ते मात्र कोठेही स्पर्धेत नाहीत. डहाणू विधानसभा मतदारसंघात डहाणू तालुक्यातील सायवन, मल्याण, डहाणू गंजाड आणि बोर्डी ही महसूल मंडळे तर तलासरी तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. यापैकी डहाणू शहरासह अन्य शहरी भागात भाजपचे वर्चस्व आहे, तर कैनाड, तलासरी, सायवन आदी भागात माकपचे वर्चस्व आहे. या वेळी निकोले यांच्या प्रचारासाठी ‘भारत जोडो’ आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव, ब्रायन लोबो, उल्का महाजन यांच्यासह विविध लोक चळवळीतील नेत्यांनी हजेरी लावली. लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक कशी महत्त्वाची आहे यावर या चळवतील कार्यकर्त्यांचा भर होता. त्यातच पथनाट्याच्या माध्यमातून केलेल्या प्रचार हा लक्षवेधी ठरला.

महिला मते निर्णायक
डहाणू विधानसभा मतदारसंघात तीन लाख २४९ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ४९ हजार ६२७ पुरुष, तर एक लाख ५१ हजार ५७८ महिला मतदार आहेत. त्याशिवाय तृतीयपंथी ३४ मतदार ही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रामुख्याने या विधानसभा मतदारसंघात महिलांची संख्या जास्त असल्याने त्यात  आपला आमदार कोण असेल हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. एकीकडे हिंदुत्ववादी विचाराचे मेढा तर दुसरीकडे डाव्या विचाराचे निकोले यांच्यात निकराची लढत असून या लढतीत कोण बाजी मारतो, याकडे केवळ डहाणूचेच नव्हे, तर राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचे कारण निकोले यांच्यामुळे हा मतदारसंघ राज्यात चर्चेचा ठरला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!