राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या ५ जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व मराठी विद्यार्थी, पालक, तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
या मोर्चात उद्धव ठाकरे यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर भाजपच्या अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे.राज्यात सुरू असलेल्या मराठी-हिंदी भाषावादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने या मुद्द्याचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात विशेष रणनीती आखण्यात आली आहे.
या रणनीतीनुसार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाला केंद्रस्थानी ठेवत भाजपकडून मराठी अस्मितेला साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच,” हे अधोरेखित करून भाजप हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवणार आहे.
मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हा भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी मोठा टप्पा आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या हिंदीविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ‘मराठी गौरव’ हाच नवा प्रचार-अस्त्र ठरणार आहे. राजकीयदृष्ट्या या रणनीतीतून भाजप जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यात कितपत यशस्वी ठरेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुकारलेल्या मोर्चाच्या तारखेत अचानक बदल करण्यात आला असून, यामागे ठाकरे गटाशी झालेला संवाद कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात ‘राज-उद्धव एकत्र येणार?’ या चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी सुरुवातीला ६ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दोन तासांतच त्यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे मोर्चाची नवी तारीख ५ जुलै जाहीर केली. काल झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चासाठी आमंत्रण देणार असल्याचे सांगितले. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख केला गेला. “त्यांच्याशी आमची माणसं संपर्क साधतील,” असेही त्यांनी नमूद केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांनी ठाकरे गटातील एका बड्या नेत्याशी थेट फोनवर संवाद साधला. त्यानंतरच मोर्चाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची संभाव्य उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आधीच ७ जुलै रोजी मराठी समन्वय समितीच्या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र, एकाच मुद्द्यावर दोन स्वतंत्र मोर्चे निघण्याऐवजी एकत्रितपणे जनआंदोलन उभारण्याच्या प्रयत्नात मनसे आणि ठाकरे गटातील हालचालींना गती मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.