Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक नुकसान झाले असेल तर ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे. या निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणाची, या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले आहेच, शिवाय भविष्याच्या संदर्भात एक भले मोठे प्रश्नचिन्ह उद्धव गट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभे केले आहे.
भाजपशी असलेली युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी संधान साधल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळाले असले तरी या अनैसर्गिक आघाडीमुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा रोष ओढवला होताच शिवाय पक्षांतर्गत एक मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे यांनी या अस्वस्थतेला वाट करून दिली आणि 40 आमदार शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. पक्ष चिन्ह शिंदे यांना देण्यात आले आणि उद्धव ठाकरे यांचा थयथयाट सुरू झाला. शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर जनताच देईल, असे उद्धव ठाकरे सारखे म्हणत असत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाने वास्तविक उद्धव सावध व्हायला हवे होते. पण शरद पवार आणि काँग्रेस यांच्यावर अधिक विश्वासून राहिल्यामुळे त्यांचा पक्ष चांगलाच अडचणीत आला.
निवडणुकांच्या आधी काही दिवस उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली आणि त्यांना सक्तीचा आराम करावा लागला. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ देता आला नाही. धावत्या सभा घेऊन त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न केला पण मोठा विजय मिळवण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
चुकीच्या उमेदवारांची निवड हे उद्धव यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. भारंभार उमेदवार देण्याच्या अट्टहासापोटी दुसऱ्या पक्षातून आलेल्या सरसकट कार्यकर्त्यांना उद्धव यांनी उमेदवारी दिली. यातील अनेक उमेदवारांना काँग्रेसचा विरोध होता. सोलापूर सारख्या जिल्ह्यात तो जाहीरपणे दिसून आला आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पडले. विजयाचा अति आत्मविश्वास असल्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचा अट्टहास झाला. काही ठिकाणी उमेदवारीचे आश्वासन देऊन आयत्यावेळी भलत्याच लोकांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे चुकीचा संदेश जनतेत गेला. त्याचा फटका उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसल्याचे दिसून आले.
नकारात्मक प्रचार हेच उद्धव ठाकरे यांचे आणि त्यांच्या बाकीच्या नेत्यांचे वैशिष्ट्ये राहिलेले आहे. व्यक्तिगत टीका टिप्पणी, शिवराळ भाषा वापरण्यावर उद्धव गटाचा भर राहिला. सत्तेत आल्यास आपण नेमके काय करणार आहोत याचे व्हिजन उद्धव गटाने मांडलेच नाही. सत्तेत आल्यास महायुतीच्या योजना बंद करू, असे विधान उद्धव यांनी केले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची मते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली नाहीत.
उद्धव ठाकरे हिंदू विरोधी होत चालले आहेत असा पद्धतशीर प्रचार भाजपने केला. हिंदू देवतांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या जुन्या क्लिप्स उकरून काढण्यात आल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच स्वामी समर्थ आणि प्रभू श्रीराम यांच्यावर टीका करणाऱ्या पक्षांच्या विरोधात उद्धव यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही हे मतदारांच्या मनावर ठसवण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेला मतदान करणारा पारंपरिक मतदार देखील त्यांच्यापासून दुरावला.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे न पुरोगामी राहिले ना प्रतिगामी राहिले. ना डावे राहिले ना उजवे राहिले. ना हिंदुत्ववादी राहिले ना डावी विचारसरणीवाले राहिले. नकारात्मक राजकारण आणि कोणतीही स्पष्ट भूमिका नसणे हीच उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचे प्रमुख कारण आहेत.