पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रीच्या पूर्वसंध्येला महत्त्वाची माहिती दिली. देशभरात जीएसटीचे नवे दर उद्यापासून लागू होणार आहे.
उद्यापासून केवळ 5 आणि 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून सर्वांचं तोंड गोड होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आपल्या देशाचं हे आत्मनिर्भर भारतासाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
“उद्यापासून नवरात्रीचा सण सुरु होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरच्या सूर्योदयापासून जीएसटीचे नवे दर लागू होतील. उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. या जीएसटी बचत उत्सवात आपली बचत वाढेल आणि आपण आपल्या आवडत्या वस्तूंना आणखी सोप्या पद्धतीने खरेदी करु शकणार आहेत. आपल्या देशाचे गरिब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी सर्वांसाठी या बचत उत्सवचा खूप फायदा होईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“सणासुदीला सर्वांचं तोंड गोड होईल. सर्वांच्या कुटुंबांमध्ये आनंद येईल. मी देशाच्या सर्व नागरिकांचं या निमित्ताने अभिनंदन करतो. यामुळे भारताची ग्रोथ स्टोरीला वाढवतील. कारभार आणखी सोप्या करतील. तसेच गुंतवणुकीला आणखी आकर्षक करतील. तसेच प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीचे साथीदार बनवतील”, असा दावा मोदींनी केला.
“२०१७ मध्ये भारताने जीएसटीचा निर्णय घेतला होता तेव्हा एक नवा इतिहास रचला गेला होता. देशाचे व्यापारी वेगवेगळ्या टॅक्समध्ये गुरफटलेले होते. वेगवेगळे टॅक्स आपल्या देशात होते. एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठवण्यासाठी कित्येक चेकपोस्ट पास करावे लागायचे. अनेक फॉर्म भरावे लागायचे. प्रत्येत ठिकाणी टॅक्सचे वेगवेगळे नियम होते. पण आता देशभरात टॅक्सचे एकच नियम आहे”, अशी माहिती मोदींनी दिली.
नरेंद्र मोदी यांचा स्वदेशाचा नारा
नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. देशात सध्या विदेशी वस्तूंची खरेदी केली जाते. पण आता आपण आपल्या देशातील कंपन्यांच्या वस्तू खरेदी करावे. याने आत्मनिर्भर भारतचं स्वप्न पूर्ण होईल, असं नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं.

















