महापालिकेतील टीडीआर गैरप्रकार प्रकरणी राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्यात बैठक झाली. बैठकीत टीडीआर प्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेश देऊन काही टीडीआर खरेदी व विक्रीवर स्थगिती देण्यात आल्याची माहिती आयुक्त आव्हाळे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेतील टीडीआर गैरप्रकाराबाबत प्रहार पक्षाचे स्वप्नील पाटीलसह अन्य जणांनी आवाज उठविला होता. त्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी टीडीआर प्रकरणी कारवाईची मागणी करून आंदोलन करण्याचा इशारा सबंधित विभागा दिला होता. त्यानंतर राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना टीडीआर, आरसीसी, डीआरसीची चौकशी होईपर्यंत पूर्णतः स्थगिती देण्याचे सुचविले होते. त्यानुसार आयुक्तानी काही टीडीआरच्या खरेदी-विक्रीवर स्थगिती दिली. तसेच कुठल्याही बांधकाम परवान्यावर हे टीडीआर चढवले असतील तर, त्या परवान्यांना तात्काळ स्थगिती देण्याचे आदेशही देण्यात आले. टिडीआर प्रकरणी चौकशी करून, अधिकारींवर कारवाईच्या सूचना बैठकीत गुप्ता यांनी आयुक्ताना दिल्या.
या बैठकीला राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासह माजी राज्यमंत्री बच्चू कडू, प्रहारचे हितेश जाधव, अँड स्वप्नील पाटील, राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी, वासू कुकरेजा, अवर सचिव निर्मलकुमार चौधरी, महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे आदिजण उपस्थित होते. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याकडील बैठकीनंतर काही टीडीआर प्रकरणी स्थगित आदेश दिल्याची माहिती दिली.