banner 728x90

‘युनेस्को’ यादीतील प्रत्येक किल्ल्यासाठी समिती; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती

banner 468x60

Share This:

युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांच्या व्यवस्थापन व संवर्धनासाठी समिती स्थापन केलेली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचे ‘युनेस्को’ने मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून नामांकन दिल्याने मराठी जनतेचे अभिनंदन. गड-किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून पुतळे उभारण्यापेक्षा किल्ल्यांचे संवर्धन व जतन करा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री शेलार म्हणाले की, या जागतिक वारसा यादीत प्रत्येक किल्ला हा केंद्र अथवा राज्य सुरक्षित वास्तू आहे. त्याचा शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि संवर्धन आराखडा तयार आहे आणि या किल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती आहे.

तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत त्या त्या जिल्ह्यातील स्वतंत्र समिती आहे. गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय काढला, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, आमच्या विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचेही जतन व संवर्धन महाराष्ट्र सरकार करेल आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून या संस्थांना गृहीत धरता येत नाही. त्यांचे निकष नीट न पाळल्यास तो हा दर्जा काढून घेतात, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत, हे विसरू नका. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचे भान बाळगावे. या सर्व गड-किल्ल्यांवर जी काही अनधिकृत बांधकामे आहेत ती तत्काळ पाडून टाका. त्यात जात-धर्म पाहण्याची गरज नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!