पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालघर येथील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या स. तु. कदम विद्यालय कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे छत पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उडाल्याने शाळेचे चार वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झालेले आहे
पालघर परिसरात 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास मेघगर्जनेसह तुफान वादळ, वाऱ्यांसह पाऊस पडला. यात पालघर येथील मराठी माध्यमाच्या स. तु. कदम विद्यालय पालघर या शाळेच्या पहिल्या माळ्यावरील खोल्यांचे छत उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पहाटे ही घटना घडली. शाळेला सुटी असल्याने तसेच शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

शाळेचे मोठे नुकसान
वादळ आणि पावसाने शाळेच्या खोल्यांचे पत्रे उडाले. वर्गातील बेंच, खिडक्या, इलेक्ट्रिक साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले असून शाळा येत्या 16 जून रोजी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी शाळेवर नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शिक्षक व पालक वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान पहिल्याच मोसमी पावसात आलेल्या वादळाने छताचे पत्रे उडून नुकसान झाले. आता एका दिवसात चार वर्गांची दुरुस्ती करून, तिथे वर्ग कसे भरवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा सुरू होण्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

















