पालघर-योगेश चांदेकर
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून अंबर दिव्याचा गैरवापर
पालघरः सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठ वर्षांपूर्वी अंबर दिव्यांच्या वापराबाबत नियमावली तयार केली आहे. असे असताना या नियमावलीला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे हे मात्र अंबर दिव्याचा गैरवापर करीत असल्याचे समोर आले आहे, या सर्व बाबींवर जिल्हा प्रशासन आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यासाठीच अंबर दिवे वापरण्याची परवानगी आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासाठी अंबर दिवे असतात; परंतु जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अंबर दिवा लावण्याची परवानगी नसते.
दीडशे किलोमीटरचा भुर्दंड शासनाच्या तिजोरीवर
या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे मात्र घरी जाण्यासाठी शासनाने भाडेतत्वावर घेतलेल्या खाजगी गाडीचा वापर करतात आणि तिच्यात अंबर दिवा लावतात. जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करणे अपेक्षित आहे. सुट्टीच्या दिवशी त्यांना घरी जाता येते; परंतु त्यासाठी पुन्हा शासकीय भाडेतत्वावर घेतलेली खासगी गाडी वापरता येते का आणि जिल्हा परिषदेच्या किंवा शासनाच्या खर्चाने आठवड्यातून दोन ते तीन वेळा पालघर येथून ठाण्यातील त्यांच्या घरी जाण्यासाठी गाडी आणि पुन्हा कार्यालयात येण्यासाठी गाडी मागवून तिचा वापर करता येतो का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
बांधकाम विभागाची गाडी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दिमतीला
मुळात सरकारच्या नियमानुसार सरकारी गाडीचा कोणत्या कार्यक्षेत्रात वापर करावा, याची नियमावली ठरलेली आहे. बैठका किंवा अन्य कारणासाठी विभागीय आयुक्त कार्यालय किंवा मंत्रालयात जाता येते; परंतु आठवड्यातून दोन ते तीन वेळा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी आणि पुन्हा ठाण्याहून पालघरला येण्यासाठी शासकीय तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. ‘आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते’ अशी पालघर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची अवस्था आहे. त्यातही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी जागृती संखे यांच्यासाठी असलेली गाडी शिंदे कशी वापरू शकतात, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घेतली का?
अधिकाऱ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल आणि त्यासाठी शासकीय वाहन वापरायचे असेल, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. रवींद्र शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अशी परवानगी घेत होते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी जागृती संखे यांची गाडी रवींद्र शिंदे वापरत आहेत. या गाडीचा गैरवापर होत असून तिच्यात अंबर दिवा लावला जातो. हा अंबर दिवा वर न बसवता गाडीच्या पुढच्या भागात ठेवला जातो. हा नियमभंग असून याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता जागृती संखे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याची अजब माहिती रवींद्र शिंदे यांनी दिली असली तरी सतत या दिव्याचा वापर जिल्हाधिकारी थाटात ते करत असतात त्यामुळे जर जिल्हा परिषदेचा अधिकारी जर अशी शक्कल लढवत असेल तर मग इतरांचे काय असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत, तसेच जिल्हापरिषद घेत असलेल्या भाड्यांच्या गाड्या जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावावर हे टेंडर घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे? त्यामुळे या गंभीर बाबींवर प्रशासन कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागली आहे
उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष
अंबर दिव्याचा गैरवापर होत असेल, तर पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र शिंदे अंबर दिव्याचा गैरवापर करीत असून, त्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने दाखवले नाही.
‘वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अंबर दिव्याचा वापर केला आहे. त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण नाही.
रवींद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर

















