राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जात असतानाच असतानाच ठाकरे बंधुंनीही पालिका निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या.
राज्याच्या राजकारणात आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका तसच पावसाळी अधिवेशन संदर्भात चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. दिलेल्या खात्याचे कामकाजं व्यवस्थितच करा, जनतेच्या कामाला प्राधान्य द्या, पक्षाच्या प्रामाणिक लोकांना आवर्जुन सहकार्य करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक यासाठी दिलेली जबाबदारी यावर लक्ष केंद्रित करा, चूकीची काम करणाऱ्या कोणत्याही मोहात अडकू नका, पक्षाची प्रतिमा आणि कारभार याकडे लक्ष द्या, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर आमदारांसोबत स्नेहभोजन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या मंत्र्यांसोबत बैठक केली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी मुद्यावर एकत्र आल्यानंतरची भाजप मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होती.