पालघर-योगेश चांदेकर
आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि राजन नाईक यांना पूर्ण ताकद देणार
पालघरः वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरातील विकासाची गती अतिशय मंदावलेली आहे. ज्यांच्या ताब्यात महानगरपालिका होती, त्यांना या भागाचा विकास करता आला नाही, अशी टीका करून वसई विरार परिसराच्या विकासाचा अनुशेष पाच वर्षात भरून काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर या भागातील आमदार स्नेहा दुबे-पंडित व राजन नाईक यांना राज्य सरकारची आणि प्रशासकीय अशी पूर्ण ताकद देऊ, अशी खात्री त्यांनी दिली.
आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री गणेश नाईक, विवेक पंडित, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक आदी उपस्थित होते.
हितेंद्र ठाकूर यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका
या वेळी मुख्यमंत्र्यांनी हितेंद्र ठाकूर व त्यांच्या पक्षाचा नामोल्लेख न करता टीका केली. वसई-विरार परिसर हा अतिशय दाट लोकसंख्येचा भाग आहे. या ठिकाणी लोकसंख्या जेवढ्या वेगाने वाढली, तेवढ्या वेगाने विकास झाला नाही. या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले. आपण शहरात राहतो, की ग्रामीण भागात असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडत होता. इतका हा भाग विकासाच्या बाबतीत मागासलेला राहिला. मुंबईनजीकच्या अन्य महापालिकांचा जसा विकास झाला, तसा विकास वसई-विरार परिसराचा झाला नाही, अशी टीका करून मुख्यमंत्री म्हणाले, की पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना या भागाचा विकास करता आला नाही. नागरिकांचे प्रश्न सोडवता आले नाहीत; परंतु आता राज्यात आपली सत्ता आहे आणि महायुतीची राज्यात सत्ता असण्यापेक्षाही या भागात स्नेहा दुबे-पंडित व राजन नाईक हे भाजपचे आमदार निवडून आले, हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्यामार्फत आता या भागाचे संपूर्ण चित्र बदलवून टाकू.
स्नेहा दुबे-पंडित यांनी घडविले परिवर्तन
पालघर परिसराच्या विकासाचा सूर्योदय आता झाला असून त्याला कोणीही थांबवू शकत नाही. विकासाचे मूलभूत प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे दोन आमदार प्रयत्न करतील आणि राज्य सरकार त्यांना पूर्ण ताकद देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विवेक पंडित यांनी यापूर्वी घडवलेल्या परिवर्तनाचा आणि आता आ. स्नेहा दुबे-पंडित यांनी घडविलेल्या परिवर्तनाचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, की वसई विरार परिसरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्नेहा दुबे पंडित यांनी सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय अतिशय महत्त्वाचे आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपले प्रश्न येथे येऊन मांडता येतील आणि आमदार स्नेहा दुबे-पंडित या त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून या प्रश्नांची तड निश्चित लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.