पालघर-योगेश चांदेकर
पालघरः वसई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांनी ‘सोशल मीडिया’ हँडल करणाऱ्या यंत्रणेने आमची चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. आता हा आरोप पाटील यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या आरोपावर बहुजन विकास आघाडीने आक्षेप घेऊन निवडणुका आयोगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे आ. हितेंद्र ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने विजय पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पाटील मागच्या वेळी शिवसेनेचे उमेदवार होते.
फसवणुकीचा आरोप भोवणार
विधानसभेच्या निवडणुकीत पाटील ‘सोशल मीडिया’वर का सक्रिय नाहीत, मतदारसंघात त्यांचा एकही फलक का नाही, माध्यमांना भेटण्याचे ते का टाळतात, अशी विचारणा माध्यमांच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर पाटील म्हणाले, की वसई विधानसभा मतदारसंघात प्रसार माध्यम आणि ‘सोशल मीडिया’चे काम सांभाळण्यासाठी आम्ही एका यंत्रणेला नियुक्त केले होते. त्यासाठी ४० लाख रुपये दिले होते; परंतु त्यांनी अगदीच नवशिक्या मुलांना माध्यमे हाताळण्याचे काम दिले. काहीच काम केले नाही. उलट ४० लाख रुपये घेऊन पसार झाले. हा आरोप पाटील यांनी केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने त्यावर आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने या चाळीस लाख रुपयांची चौकशी करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या मुबारक शेख यांनी केली.
अंगलट आल्यावर सारवासारव
ही मागणी पुढे आल्यानंतर मात्र विजय पाटील यांनी सारवासारव केली आणि बोलण्याच्या ओघात आपण तसे बोललो. प्रत्यक्षात आम्हाला चाळीस लाख रुपये खर्चाचीच मर्यादा आहे. त्यातील काही रक्कम त्यांना दिली होती, असे त्यांनी सांगितले; मात्र आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल.
दहशतीचा आरोप आणि विजयाचा दावा
दरम्यान, पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना बहुजन विकास आघाडीची वसई विधानसभा मतदारसंघात दादागिरी असून आम्ही निवडणुकीच्या काळात काही फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी मागितली होती; परंतु ही परवानगी आम्हाला मिळाली नाही. यंत्रणा दहशतीखाली असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जनता दहशतवादाला वैतागली असून जनता माझ्याबरोबर आहे. मी माझे काम केले आहे. जनता आता निवडणुकीच्या दिवशी त्यांचे काम करणार आहे आणि २५ हजार मतांच्या फरकाने मी निवडून येईल, असा दावा पाटील यांनी केला.
ठाकूर एक लाख मतांनी विजयी होण्याचा दावा
दरम्यान, बहुजन विकास आघाडीच्या मुबारक शेख यांनी पाटील यांचा दावा खोडून काढला. वसई मतदार संघात गेल्या ३५ वर्षांपासून आमदार हितेंद्र ठाकूर यांचे काम आहे. जनता त्यांच्याबरोबर आहे. जनतेला कुठेही दहशत जाणवत नाही. तीन-चार वर्षापासून तोंड दाखवणाऱ्यांना त्याचे महत्त्व कळणार नाही. आमदार ठाकूर किमान एक लाख मतांच्या फरकाने निवडून येतील, असा दावा शेख यांनी केला.

















