पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरव्यवहाराचे आता आगळे वेगळे नमुने पुढे यायला लागले आहेत. आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाहन चालकाला धमकावून त्यालाच बळजबरीने लॉन्ड्री चालक बनवले आणि त्याच्या नावावर सुमारे तीन लाख रुपयांची बिले काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता या गंभीर प्रकाराची आरोग्य विभाग काय दखल घेतो, याकडे लक्ष लागणे स्वाभाविक आहे.
डहाणू तालुक्यातील प्राथमीक आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराचे एक एक नमुने ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणले असून आता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनावर चालक असलेल्या सचिन ठाकरे याच्या बाबतीतला आगळावेगळा अनुभव पुढे आला आहे. ठाकरे यांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार त्याच्या पगाराची एक लाख ४० हजारांची जमा झालेली रक्कमही गडग यांनी धमकावून ती काढून घेतली. तत्कालीन तालुका आरोग्याधिकारी संदीप गाडेकर यांना ती देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यातील दोन हजार रुपये फक्त ठाकरेला देण्यात आले आणि एक लाख ३८ हजार रुपये गडग यांनी घेतल्याचा आरोप सचिन ठाकरे यांनी केला आहे.
पंचायत समितीने पगार केल्याचे दाखवले
सचिन याने पगारासाठी पंचायत समितीत संबंधितांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी पगार खात्यावर जमा केल्याचे दाखवले. पगाराची रक्कम एक लाख ४० हजार रुपयांची होती. ही रक्कम आपलीच असताना डॉ. गाडेकर यांची असल्याचे सांगून ती काढून द्यायला लावली, असे सचिनने म्हटले आहे.
सचिनच्याच नावाने लाँड्री आणि सह्याही!
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राने रुग्णालयातील बेडशीट, उशांचे कव्हर तसेच गरोदर मातांचे कपडे धुण्यासाठी निविदा मागवली. त्यानुसार दोन-तीन संस्थांच्या बनावट निविदा तयार करण्यात आल्या. एका निवीदेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रातील कपडे २६८ रुपये प्रति किलो या दराने धुवून मिळतील असे पत्र तयार करण्यात आले, तर दुसऱ्या एका पत्रानुसार २१० रुपयांचा दर दाखवण्यात आला, आशागड आरोग्य केंद्रात नोकरीस असलेल्या सचिन ठाकरे याला बोलावून त्याच्याच नावाने लॉन्ड्रीचे लेटरपॅड, सही शिक्के बनवण्यात आले आणि पत्रही तयार करण्यात आले. त्यानुसार १९१ रुपये प्रति किलो या दराने हे काम गंजाड येथील ‘सचिन लॉन्ड्री’ला देण्यात आले.
दोन लाख ८१ हजार जमा
अशा प्रकारची कोणतीही लॉन्ड्री अस्तित्वातच नाही, असा आरोप सचिन ठाकरे याने केला आहे. त्याने दिलेल्या तपशीलानुसार त्याच्या खात्यात दोन एप्रिल २०२४ रोजी ५८ हजार ८७३ आणि ६३ हजार ५०४ रुपये जमा झाले. २४ एप्रिल २०२४ रोजी ६० हजार ४१७ रुपये आणि १६ ऑगस्टला ९९ हजार रुपये जमा झाल्याचे दाखवण्यात आले. ही एकूण दोन लाख ८१ हजार ७९४ रुपयाची रक्कम सचिन ठाकरेच्या खात्यावर जमा झाली आणि नंतर त्याला दमदाटी करून ही रक्कम डॉ. गडग यांनी काढून घेतली, असा आरोप ठाकरे याने केला आहे.
पासिंग न झालेल्या गाडीचा वापर
आणखी एक गंभीर बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वाहनाला अपघात झाला, तर त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची असते. आरोग्य विभागाने पासिंग केलेली रुग्णवाहिका आशागडला पाठवली; परंतु आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राने ही गाडी गंजाड आरोग्य केंद्राला पाठवली. गंजाड येथील पासिंग न झालेली रुग्णवाहिका आशागडला आली. या रुग्णवाहिकेवर सचिन चालक होता. रुग्ण घेऊन जाताना या गाडीला अपघात झाला. वास्तविक जिल्हा परिषदेने या गाडीची दुरुस्ती करण्याऐवजी सचिनला दमदाटी करून तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन गाडीची दुरुस्ती सचिनच्याच पैशातून करण्यास भाग पाडण्यात आले. सचिनने तसा आरोप केला असून आता हे गंभीर प्रकारावर आरोग्य विभाग यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यात दर पन्नास-साठ रुपये, तर गंजाडला १९१ रुपये!
कपडे धुण्याचा आणि इस्त्री करण्याचा पुण्यातला प्रति किलो दर ५० ते ६० रुपये असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात कपडे मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे दर कमी असणे अपेक्षित होते; परंतु येथे १९१ रुपये प्रति किलो दर देण्यात आला. हा दर आला कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासन तरी एवढ्या मोठ्या दराला मान्यता कशी देते आणि रुग्ण कल्याण समिती काय करत होती, की रुग्ण कल्याण समितीला अंधारात ठेवून हे व्यवहार झाले, याची आता चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
छळामुळे राजीनामा
डॉ. अक्षय गडग आणि डॉ. देवेंद्र पाटील यांच्या छळाला आणि खोटेपणाला कंटाळून आपण आठ वर्षे सेवा केल्यानंतर वाहन चालक या पदाचा राजीनामा दिल्याचे सचिनने म्हटले आहे.