पालघर-योगेश चांदेकर
भूसंपादन करून रस्ता व्यवस्थित करण्याची मागणी
माजी आमदार आनंद ठाकूर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
पालघरः वाणगाव-चिंचणी रस्ता व फाटक पूर्व उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले काम अतिशय चुकीचे झाले असून. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस उतरणीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहे. या प्रश्नावर माजी आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
वाणगाव पूर्व व वाणगाव पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे पूल आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डहाणू कार्यालयाने केले आहे. वाणगाव पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणाऱ्या रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक त्रुटी राहिल्या आहेत.
उड्डाणपुलाच्या उतरणीत अडथळे
या उड्डाणपुलाच्या उतरणीस अडथळा निर्माण होत असून, त्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही वाणगाव- चिंचणी रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला जागेचा मोबदला न देता जागा संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पूर्ण जागांचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळालेला नाही. रस्त्याचे काम अपूर्ण आहे. रस्त्याच्या अपूर्ण कामाचा अडथळा येत असून, येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
नुकसान भरपाई देऊन जागांचा ताबा घ्या
ठाकूर यांनी या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून वाणगाव-चिंचणी रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील जागांचे संपादन करण्यासाठी जागामालकांना त्वरित जागेचा मोबदला मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जागामालकांना न्याय मिळवून द्यावा तसेच ही जागा तातडीने हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी आणि रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून अपघात कसे टाळता येतील हे पाहावे, अशी मागणी माजी आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.