पालघर-योगेश चांदेकर
परिस्थिती काहीही असो
संकटे कितीही असो
असेल स्वप्न जर उरासी
आणि बनलो जर स्वतः लायक
आव्हाने मग किती असोत
बदलू शकतो जगही आपण
भलेही नियतीची मर्जी काही असो
पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे यांना ही कविता तंतोतंत लागू होते. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा!
देशात सध्या युवकांना राजकारणात संधी आली आहे. त्यामागचं कारण आपला देश तरुण आहे आणि या तरुणांची दखल राजकीय पक्षांना घ्यावी लागते तसंच ती भारतीय जनता पक्षाला पंकज कोरे यांच्या बाबतीत घ्यावी लागली. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून संधीचं सोनं केलं. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माजी खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित यांचा पराभव करून पंकज हे ‘जायंट किलर’ ठरले. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनई जिल्हा परिषद गटानं केवळ पालघर जिल्ह्याचंच नव्हे, तर राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मनसे आदी पक्षांनीही तिथं उमेदवार दिले होते; परंतु भाजपच्या पंकज कोरे यांनी वनई गटातून कमळ फुलवलं. युवा नेतृत्व असतानाही गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. या संधीचं त्यांनी सोनं केलं. स्वप्न अनेकांच्या मनात असतात; परंतु साऱ्यांनाच ते शक्य होत नाही. काहींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी वेळ जातो. त्या कालावधीत नाउमेद न होता प्रयत्नांची पराकाष्टा करीत स्वप्नं पूर्णत्त्वाला न्यावी लागतात. पंकज कोरे यांनी अशाच प्रकारे आपलं स्वप्न पूर्णत्वाला नेलं. गुजरातमध्ये शिक्षण घेऊन डहाणू तालुक्यातील आपलं वनई भाग कार्यक्षेत्र निवडून तिथं त्यांनी आपलं काम प्रभावीपणे केल्याचं बक्षीस त्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वच्या रूपानं मिळालं. पंकज हे भाजपचे सदस्य असले, तरी त्यांनी आपल्यावर वैचारिक मर्यादा घालून घेतल्या नाहीत. एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पालघर जिल्ह्याला अलीकडच्या काळात ओळख झाली आहे. त्यांचं फेसबुक पेज पाहिलं, तर ते किती लोकांशी आणि कसे जोडले आहेत. हे लक्षात येतं. दिनविशेष असतात. त्यांचा गाढा अभ्यास दररोज फेसबुकवरच्या पोस्टवरून दिसतो. कुणाची ना कुणाची जयंती, कुणाची ना कुणाची पुण्यतिथी, स्मृतिदिन. सण आदी घटनांवर पंकज यांचं भाष्य ठरलेलं असतं. वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देणं हे तर ते दैनंदिन कामकाज समजतात. भारतीय जनता पक्षाचे असले तरी त्यांना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याविषयी तेवढीच आस्था असते. त्यामुळं तर पंडित नेहरू यांच्या जयंतीला त्यांचं आवर्जून अभिवादन असतं. सामान्य माणूस राजकारणात काय करू शकतो, हे पंकज यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आहे.
युवा पिढीनं जागरूक असलं पाहिजे. आपण ज्या गटात, ज्या परिसरात राहतो, त्याच्या समस्या काय आहेत, त्याची जाणीव युवकांना असली पाहिजे आणि या समस्या सोडवण्याचे मार्ग कोणते, हे ही त्यांना अवगत असलं पाहिजे. पंकज यांच्या बाबतीत त्यांनी हे सर्व साध्य केलं आहे. राजकारण स्वतःच्या फायद्यासाठी करू नये, तर ते समाजाच्या भल्यासाठी करावं, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. स्वतःच्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्याबरोबरच समाजातील दीनदुबळ्यांची, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करावी, हा विचार ते कृतीतून प्रत्यक्षात आणतात. देशासाठी जे आवश्यक आहे ते ते करणं हे आपलं काम आहे. ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या झपाट्याचा आणि युवकांविषयी त्यांच्या असलेल्या दृष्टिकोनाचा पंकज यांच्यावर मोठा प्रभाव आहे. विकसनशील देशाचं विकसित देशात रूपांतर करणं हे आपलं महत्त्वाचा ध्येय असलं पाहिजे आणि नव्या नेतृत्वानं त्या दृष्टीनं स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत, यावर त्यांचा विश्वास आहे. त्या दृष्टीनं ते काम करतात. आपण समाजासाठी नेतृत्व करणारे आहोत. सचोटीपणा आणि प्रामाणिकपणे नेतृत्व करणाऱ्यांची संख्या कमी असली, तरी पंकज यांनी मात्र या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाचं सार मानल्या आहेत. लोकांच्या गरजांकडे पाठ फिरवून नेतृत्वाचा देखावा करणं चांगलं नाही. हे चित्र बदललं पाहिजे आणि ते बदलण्यासाठी आपल्यासारख्या युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे याची जाणीव पंकज यांना आहे. नेतृत्व हक्क, सत्ता आणि मोठेपणा मिळवण्यासाठी नसतं, तर दुर्लक्षित समाजाची दखल प्रशासनाला घ्यायला लावून त्यांचे प्रश्न सोडवला लावणारं खरं नेतृत्व असतं. तसं केलं, तरच आपण समाजाच्या कसोटीला उतरतो, याची जाणीव पंकज यांना आहे. नव्या पिढीचे विचार, नव्या पिढीचे प्रश्न आणि त्यात हवे असणारे बदल याचा विचार करून त्या दृष्टीनं वाटचाल करणाऱ्या ठराविक नेतृत्वात पंकज यांची गणना होते. हेच तरुण्य नेतृत्व अनेक समस्यांचा योग्य तो तोडगा काढताना दिसतं. प्रस्थापित नेतृत्वातला त्यामुळे तर शह मिळतो. पंकज यांनी वनई गटाच्या निवडणुकीतून ते दाखवून दिलं आहे. तरुणांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांना जबाबदारीची जाणीव आहे आणि समाज माध्यमाची कल्पकता त्यांच्यात आहे. पंकज हे त्यापैकीच एक आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून एका क्षणात आपलं काम आणि आपली प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात.
राजकारण निवडणुकीपुरतं असतं. पक्ष तोपर्यंतच असतो. एकदा निवडून आल्यानंतर आपण सर्वांचे झालं पाहिजे हा व्यापक दृष्टिकोन राजकीय नेत्यांनी ठेवला पाहिजे. पंकज यांच्याकडं तो आहे. खोटी आश्वासनं द्यायची नाहीत. कारणांचा भडीमार करायचा नाही. शक्य असतील ती सर्व कामं करायची. आपण आपल्या मतदारसंघाला आणि निवडून दिलेल्या जनतेला उत्तरदायी आहोत, याची सतत जाणीव ठेवायची ही वृत्ती पंकज यांच्याकडं आहे. कला, क्रीडा अशा सर्वच प्रकारांना ते उत्तेजन देतात. शालेय विद्यार्थ्यांपासून ते युवकांपर्यंतच्या सर्वच घटकांच्या समस्या मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या कलागुणांना प्रोत्साहन देणं, प्रसंगी खिशाला झळ सोसून मदत करणं अशी काम ते कोणत्याही प्रसिद्धीविना करत असतात. समाजातील विषमता, महिलांचे प्रश्न याची उत्तम जाण त्यांना आहे. प्रगल्भतेनं ते वेगवेगळ्या व्यासपीठांवर प्रश्न ते मांडत असतात. सोडवणूक करून घेत असतात. वर्षानुवर्ष चालत आलेला भ्रष्टाचार आणि आणि अनागोंदी कारभार याला जनता कंटाळली आहे. खोटी आश्वासनं ऐकून नागरिक त्रस्त आहेत. त्याला फाटा देऊन विकासाचं राजकारण करण्याची वेगळी पाऊलवाट पंकज यांनी चोखाळली आहे. राजकीय पार्श्वभूमी नसली, तरी स्वकष्टातून आणि जोडलेल्या लोकांतून असाध्य ते साध्य करता येतं, हे पंकज यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. निर्णय क्षमता, बदल घडवण्याची जिद्द आणि विचारातील वेगळेपण हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मोठ्या माणसांचा दांडगा अनुभव आणि तरुण वर्गाचे भन्नाट विचार एकत्र करण्याची क्षमता त्यांच्याकडं असल्यामुळे त्यांच्याकडून पालघर जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत. आत्ताच्या पिढीला सरळ, साधं आणि पारदर्शक नेतृत्व हवं असतं. हे नेतृत्व पंकज यांच्याकडं आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्या संधीसाधू राजकारणाला जनता आता कंटाळली आहे. उदयास येणाऱ्या तरुण नेतृत्वात त्यांना सशक्त पर्याय सापडतो. हा पर्याय डहाणू तालुक्यात पंकज यांच्या रूपानं तेथील जनतेला सापडला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना लढा देताना कायदा आणि सुव्यवस्था पाळली पाहिजे. प्रत्यक्षात पारदर्शकता असली पाहिजे, यावर पंकज यांचा विश्वास असून प्रामाणिकपणाच्या जोरावर नवं नेतृत्व पुढं आलं, तर नजीकच्या काळात देशाची महासत्ता होण्याचं स्वप्न साकार होईल, यावर त्यांचा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकासाच्या वाटेवर आणलं आहे. महासत्ता करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीपासून देशपातळीवर काम करणाऱ्या नेतृत्वाच्या फळीनं त्यांना साथ द्यायला हवी, असं पंकज यांना वाटतं. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असतात.