उद्यापासून (२३ फेब्रुवारी) राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, त्यापूर्वी आज (२२ फेब्रुवारी) महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी काही जणांनी प्रयत्न केले, मात्र महायुती सरकारने ते प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची असून ती पुढेही सुरू ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ दरम्यान होणार आहे. याच अधिवेशनात ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
अजितदादांनी अर्थसंकल्पावर प्रचंड मेहनत घेतली होती- देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या ६ मार्च रोजी ते महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानमंडळात सादर करणार आहेत. केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या निधीत तब्बल २० हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली. फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अजितदादांनी प्रचंड मेहनत घेतली होती, असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. एखादी योजना व्यवहार्य नसल्यास किंवा शक्य नसल्यास अजितदादा स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायचे, असा त्यांचा स्पष्टवक्तेपणा होता, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
“हम नही सुधरेंगे”
दरम्यान, महाविकास आघाडीने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, विरोधक स्वतःच एकत्र नाहीत. त्यांच्या बैठकीवरच त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. “हम नही सुधरेंगे” अशी त्यांची अवस्था झाली असून विनाकारण चहापानावर बहिष्कार घालून ते राजकारण करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. दिल्लीतील एआय समिटदरम्यान काँग्रेसने केलेल्या आंदोलनावरही त्यांनी सडकून टीका केली.
अजितदादांचे स्वप्न पूर्ण करू- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढली. त्यांनी सांगितले की, अजितदादांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केले. यंदाचा बारावा अर्थसंकल्पही त्यांनी मांडला असता; मात्र दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे त्या म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत, यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार असल्याचे सांगितले. फडणवीस हे अर्थकारणाची जाण असलेले नेते असून त्यांना सामान्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
















