Sanjay Raut on Municipal Elections: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. जागा वाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे हट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचं आहे असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे.
महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढणार असल्याने राऊतांनी स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनीही पालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.
“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचंच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचं ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत,” असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन महाविकास आघाडीत आता खटके उडत आहेत. महाविकास आघाडीच्या दारुण पराभावानंतर मविआचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विधानसभेसाठी जागावाटपात वेळ घालवल्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी केला आहे. यावरुन आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मरगळ झटका आणि कामाला लागा असा सल्ला दिला. त्यावर प्रत्युत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा सल्ला दिला होता.