जेमिमा रॉड्रीग्ज, स्मृती मानधना आणि राधा यादव यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रत्येकी २.२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.
भारतीय महिला संघाने नुकताच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि या ऐतिहासित जेतेपदात महाराष्ट्राच्या पोरींचा महत्त्वाचा वाटा होता. जेमिमाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची खेळी करून संघाला विश्वविक्रमी विजय मिळवून दिला होता. तर स्मृतीने या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आणि राधा यादवनेही अंतिम सामन्यात चांगली गोलंदाजी केली.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याच्या निर्णयाला मंजूरी मिळाली. यानुसार जेमिमा, स्मृती व राधा यांना प्रत्येकी २.२५ कोटी दिले जाणार आहेत, तर मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार यांना २२.५ लाख रुपये दिले जाणार आहेत. भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून इतिहास रचला आहे.
ईस्ट बंगाल सरकारने दीप्ती शर्मा व रिचा घोष या दोन खेळाडूंचा गौरव केला आहे. दीप्तीने या स्पर्धेत २१५ धावा व २२ विकेट्स घेताना प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार जिंकला. रिचाने २३५ धावा केल्या आणि स्पर्धेत सर्वाधिक १२ षटकारांचा संयुक्त विक्रम नावावर केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग असलेल्या क्रांती गौड या अष्टपैलू खेळाडूला एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची घोषणा केली.
बीसीसीआयनेही भारतीय महिला संघासाठी ५१ कोटीच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी २०२५ चा वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी २००५ व २०१७ मध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण, यंदा पोरींनी सर्वच आघाडींवर दमदार कामगिरी करून दाखवली.
आयसीसीने महिला वर्ल्ड कपसाठी गेल्या स्पर्धेपेक्षा जवळपास तिप्पटपटीने बक्षीस रक्कमेत वाढ केली होती. २०२२ महिला वर्ल्ड कपमध्ये ३१ कोटी रुपयांची (३.५ मिलियन अमेरिकन डॉलर) बक्षीसं देण्यात आली होती, तर २०२५ साली हीच बक्षीसांची रक्कम १२३ कोटी (१३.८८ मिलियन अमेरिकन डॉलर) झाली. १२३ कोटी बक्षीसांपैकी भारतीय संघाला सर्व सामने आणि विजेता म्हणून एकूण ४० कोटी (४.४८ मिलियन अमेरिकन डॉलर) बक्षीस रक्कम मिळाली.

















