पालघर-योगेश चांदेकर
बोनसमध्ये चार टक्के कपातीने नाराजी
पंधरा वर्षापासून कामगारांना कायम करण्यास टाळाटाळ
पालघरः पालघर तालुक्यातील बोईसर तारापूर येथे टाटा कंपनीचा प्लांट आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जाते. आता तर कॅन्टीन सुविधेपाठोपाठ बोनसमध्येही कपात करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
‘टाटा’चे देशभरात अनेक ठिकाणी प्रकल्प आहेत; परंतु प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत. जमशेदजी प्रकल्पात दोन अडीच वर्ष काम केल्यानंतर कामगारांना कायम केले जाते; परंतु बोईसर तारापूर येथील प्रकल्पात पंधरा-सोळा वर्षे काम करूनही कामगरांना कायम करण्यात आलेले नाही. त्यांची पंधरा-सोळा हजार रुपये पगारावर बोळवण केली जाते. पगारवाढ करताना एक दिवसाला आठ रुपये इतकी नाममात्र वाढ करून कामगारांच्या जखमेवर मीठ चोळले जाते. अशा पद्धतीने महिन्याला केवळ २४० रुपयेच वाढ मिळते.
खर्च कपातीच्या नावाखाली सुविधांवर कुऱ्हाड
या प्रकारामुळे कामगारांत नाराजी आहे. पूर्वी टाटा प्रकल्पांच्या कंपन्यात कामगारांना कॅन्टीनमध्ये जेवण मोफत मिळत होते; परंतु खर्चात कपातीच्या नावाखाली ही सुविधा बंद करण्यात आली. कामगारांनी नाराजी व्यक्त न करता काम सुरू ठेवले. ‘कॉस्ट कंट्रोल’ फक्त कंत्राटी कामगारांच्या माथी मारले जाते का, असा प्रश्न कंत्राटी कामगार करत आहेत. उत्पादन विभागात काम करताना कंत्राटी कामगार हे कायमस्वरूपी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. उत्पादनात कायम कामगारांइतकाच घाम कंत्राटी कामगार गाळत असतात; परंतु कायम कामगारांना मिळणाऱ्या सुविधा आणि कंत्राटी कामगारांना मिळणाऱ्या सुविधा यात जमीन आसमानाचा फरक आहे.
वेतन आणि बोनसमध्येही तफावत
कायम कामगारांना किमान ५०-६० हजार रुपये वेतन असताना कंत्राटी कामगारांची बोळवण १५-१६ हजार रुपयांवर केली जाते. कायम कामगारांना ७० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत बोनस देण्यात आला आहे; परंतु मान मोडून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना मात्र त्यांच्या इतका नाही, तरी किमान पूर्वी इतका बोनस मिळावा, अशी मागणी आहे. कायम कामगारांना वीस टक्के बोनस देण्यात आला आहे, तर कंत्राटी कामगारांना पूर्वी १२ टक्के बोनस दिला जात होता; परंतु या वर्षी फक्त ८.३३ टक्के बोनस कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांना महागाई वाढीच्या तुलनेत अत्यंत कमी पगारवाढ दिली जाते. पुरेसे वेतन मिळत नाहीत. त्यामुळे अनेक कामगार काम सोडून जात असताना व्यवस्थापन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
‘पालघर येथील टाटा स्टीलच्या प्रकल्पात कायम कामगारांना वीस टक्के बोनस देण्यात आला आणि आमचा बोनस मात्र आठ टक्क्यांवर आणला. सुरुवातीला कॅन्टीनला मोफत सुविधा मिळत होती, ती बंद करण्यात आली. कामगारांना कायम केले जात नाहीत. तक्रार करायला गेले तर धमकावले जाते, असे अनेक मुद्दे आहेत; परंतु त्याकडे व्यवस्थापनाचे लक्ष नाही. दिव्याखाली अंधार अशी ‘टाटा स्टील’ची परिस्थिती आहे.
-निमेश पाटील, कंत्राटी कर्मचारी, टाटा वायर्स.