पालघर-योगेश चांदेकर
पालघरः विवळवेढे येथे महालक्ष्मी देवीचे जागृती देवस्थान असून या देवीच्या यात्रेला महाराष्ट्र, गुजरात, दादरा, नगर हवेली आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक, व्यापारी येत असतात. ही यात्रा मोठ्या प्रमाणात पार पडली. ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले; परंतु असे असूनही यात्रेकरूंना भाविकांना मूलभूत सुविधा देण्याकडे मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.
यात्रा संपल्यानंतर यात्रेच्या ठिकाणी कचरा डेपोचे स्वरूप आले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विवळवेढे येथे महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणची यात्रा मोठ्या संख्येने भरते. पंधरा दिवस भरणाऱ्या यात्रेत भाविकांची गर्दी असते. यात्रेत होणारी गर्दी आणि या ठिकाणी होणारा मोठा व्यापार लक्षात घेतला, तर तिथे लाखो रुपयांची उलाढाल होते. यात्रेकरू आणि व्यापाऱ्यांसाठी आरोग्य पाणी व अन्य सुविधा पुरविणे ग्रामपंचायत जबाबदारी असताना मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले.
ट्रस्टकडून सुविधा
व्यापाऱ्यांकडून दुकानाचा आकार व प्रकारानुसार हजारो रुपयांचा कर वसूल केला जातो. व्यापाऱ्यांची संख्या लक्षात घेतली, तर हा कर लाखो रुपयात जातो. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळूनही ग्रामपंचायतीने मात्र यात्रेच्या काळात फक्त साफसफाई वगळता अन्य कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे भाविकात प्रचंड नाराजी होती. महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टने यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज अन्य व अन्य सुविधा दिल्या. आरोग्याची जबाबदारी प्रशासन करते. आरोग्य कर्मचाऱ्यांना अन्य सुविधा देवस्थान ट्रस्टने पुरववल्या.
पाणी सामाजिक संस्थेकडून
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेनेचे डहाणू तालुकाप्रमुख संतोष देशमुख सामाजिक कार्यकर्ते इंन्द्रेश सोलंकी आदींनी स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यासाठी पंधरा दिवस टँकर चालू होते; परंतु ग्रामपंचायतीने मात्र याबाबत काहीच केले नाही.
ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न
ग्रामपंचायत अधिकारी सुहास दांडेकर मात्र यात्रेकरूंच्या सुविधाचे श्रेय ग्रामपंचायतीकडे घेतात, त्यावरून आता देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्यात श्रेयाची स्पर्धा सुरू आहे. यात्रा संपली असली, तरी काही व्यापारी अजून त्या परिसरात आहेत. यात्रेच्या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग पडले आहेत. आता काही ठिकाणी कचऱ्याचे खच तयार झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक
जनावरे या कचऱ्यात चरतात. त्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन जनावरांच्या आरोग्य ही धोक्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करणे आवश्यक असताना ग्रामपंचायत मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे भाविक संतप्त झाले आहेत. स्थानिक नागरिकांचे आरोग्य ही कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी सुहास दांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना ग्रामपंचायतीला करातून किती उत्पन्न मिळते आणि स्वच्छता का केली नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत
कोट
महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त हजारो भाविक विवळवेढे येथे आले होते. यात्रेत व्यापारी आणि ग्रामपंचायतीचा फायदा झाला; परंतु यात्रा संपल्यानंतर ग्रामपंचायतीने स्वच्छता न केल्यामुळे घाणीचा प्रचंड त्रास होत आहे.
विलास परब, भाविक, मुंबई
कोट
यात्रा संपली असली, तरी कांदा, लसणाचे व्यापारी तिथेच असल्यामुळे स्वच्छता केली जात नाही. सोमवारपासून स्वच्छता करणार आहोत. यात्रेमुळे ग्रामपंचायतला किती उत्पन्न मिळाले, याचा अजून हिशेब केलेला नाही. अंदाजे उत्पन्न सांगता येणार नाही.
सुहास दांडेकर, ग्रामपंचायत अधिकारी, विवळवेढे, ग्रुप ग्रामपंचायत