पालघर : योगेश चांदेकर – कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्यासाठी नेट आणि सेट या दोन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेकांना दिर्घ कालावधी लागतो. मात्र पालघर जिल्ह्यातील निशाताई सवरा यांनी पहिल्याच प्रयत्नात सेट (State Eligibility Test) ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्वर्गीय विष्णूजी सवरा यांच्या त्या कन्या आहेत. सेट परीक्षेचा एकूण निकाल हा फक्त 6 टक्केच लावला जातो. त्यात निशा सवरा यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निशा सवरा यांचा शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही मोठा वाटा आहे. यांच्या कार्याबद्दल सांगायचे झाले तर, त्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार, कार्यशाळा, जनरल नाॅलेज परीक्षांचे आयोजन करतात. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भात आवड निर्माण होऊ शकेल. त्याशिवाय, आसमंत सेवा संस्थेच्या त्या अध्यक्षा असून या संस्थेमार्फत पेसा कायदा व वन जमीन हक्क कायदा याविषयी प्रतिनिधींसाठी कार्यशाळांचे आयोजन करतात. आसमंत सेवा संस्थेतर्फे ग्रामीण भागातील सुमारे 3500 महिलांना फॅशन ज्वेलरीचे प्रशिक्षण देऊन निशा यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. म्होरकी’ आदिवासी महिला संघटनेच्या त्या सरचिटणीस असून या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी महिलांचे संघटन करून त्यांना रोजगार विषयक मार्गदर्शन व कार्यशाळांचे आयोजन करतात. हे सामाजिक कार्य करून सुद्धा निशा सवरा यांनी सेटमध्ये यश प्राप्त केले की कौतुकास्पद बाब आहे.
सेट ही परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यामार्फत प्रत्येक राज्यात वेगळी घेतली जाते. महाराष्ट्रात 1995 पासून सावित्रीबाई फुले पुणे या विद्यापीठात सातत्याने ही परीक्षा आयोजित केली जात आहे. ही परीक्षा पदव्युत्तर पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी देऊ शकतात. महाराष्ट्रात ही परीक्षा महाराष्ट्र व गोवा या राज्यासाठी घेतली जाते. 2020 यावर्षी सेट ही परीक्षा 61,114 विद्यार्थ्यांनी दिली होती.
सेट ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेकांना मोठा कालावधी लागतो. त्यात कित्येक विद्यार्थ्यांना अपयशही येते. मात्र अभ्यास केले तर कोणतीही परीक्षा सहजरित्या पास करता येते. हे निशा सवरा यांनी जगाला दाखवून दिले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवल्याने पालघर जिल्ह्यात आनंद व्यक्त केले जात आहे.
गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य तो मार्गदर्शन मिळत नसल्याने ते फक्त पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतात. मात्र या विद्यार्थ्यांनी त्यापलीकडेही जाऊन सेट परीक्षा द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही यात समावेश होईल. B-ED, D-ED यापलीकडे जाऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी. शासनाने ही या परीक्षेसंदर्भात सर्व सोयी सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून घ्याव्यात. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थीही पुढे जाऊ शकेल. असा संदेश निशा सवरा यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना दिला आहे.
राजकीय घराणे असून सुद्धा राजकारणात न पडता विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द आणि चिकाटी निशामध्ये होती, आणि त्यांनी ती पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करून दाखवली आहे. ‘यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’ या पुरुषप्रधान संस्कृतीप्रिय वाक्याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही ओव्हरटेक करत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘निशा सवरा’. निशा सवरा यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी लक्षवेधी न्युजकडून शुभेच्छा…