banner 728x90

आगामी महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती नाही; आशिष शेलारांचे स्पष्टीकरण

banner 468x60

Share This:

सांगली : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपकडूनही स्वबळाचे संकेत मिळत आहे. भाजपचे नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेबरोबर युती करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती न होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शेलार सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आघाडीत गेल्याने मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही मनसेला सोबत घेऊन लढणार का? अशी विचारणा करण्यात आली. त्याला शेलार यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. यावेळी शेलार यांनी ठाकरे सरकारच्या वाटचालीवरही भाष्य केले.

हे तीन चाकाच्या सरकार अंतर्गत वादानेच कोसळेल. सरकारमध्येच विसंवाद आहे. त्यामुळे आम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही. नाना पटोले दरवेळी विनोदी वक्तव्य करतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले. त्यांचा कोर्डवर्ड अमजद खान ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. भरसभागृहात त्यांनी हे सांगितलं. त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचं वक्तव्य बदललं. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. आता विदर्भात गेले आहेत, वाटतं पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील.
जो माणूस स्वत:च्या विधानावर टिकू शकत नाही, त्याची केस काय टिकणार? असा सवाल शेलार यांनी केला. सरकारने पटोलेंच्या आरोपांची खुशाल चौकशी करावी. पटोलेंना हे सर्व सांगायला दोन वर्षे का लागली याचीही चौकशी करावी, त्यांनी हा विषय का दाबला त्याचीही चौकशी करावी, त्यांनी कल्पोलकल्पित आरोप केले का? त्याचीही चौकशी करावी, अशी मागणीच त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शेलार यांनी आज पुन्हा आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. फडणवीस सरकारने आरक्षण दिलं.
कायद्यात रूपांतर केलं. प्रत्यक्ष फायदा झाला. मुंबई न्यायालयात सर्व युक्तिवाद झाल्यावरही आरक्षण टिकलं. तरीही हे आरक्षण गेलं कसं? असा सवाल करतानाच हे आरक्षण रद्द होण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा कुटिल डाव कालही होता. मराठा आरक्षणासाठी या सरकारने आता भोसले समिती नेमली. या समितीने अहवाल दिला. त्यांनी मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल, सांख्यिकी डाटा तयार करण्याचे काम द्या, अशी सूचना केली. पण ठाकरे सरकार काम करत नाही. फक्त केंद्राकडे बोट दाखवत आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही.
पण हा खेळखंडोबा जास्त काळ चालणार नाही, असं ते म्हणाले. जे आम्ही करू शकलो नाही, ते भाजपनं केलं हेच सरकारला खुपत आहे. म्हणून सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसावे. व्होट बँक भाजपकडे सरकू नये म्हणूनच भाजपने केलेला कायदा मंजूर केला जात नसावा. या स्वार्थापोटी आघाडी सरकार हे सर्व करत असल्याची आमची शंका आहे, असेही शेलार म्हणाले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!