उमेळा ( वॉर्ड क्र. १०६ ) येथे वसई ते नायगाव स्टेशन ह्या मुख्य रस्त्यावर पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बऱ्याच ब्रिटिशकालीन उघाड्या होत्या. त्यापैकी संदेश वर्तक ह्यांच्या घराजवळ असलेल्या उघाडीतून पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजूचे उघडे गटार काही दिवसांपूर्वी खणून पाणी जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला होता.
पण रस्त्यावरील ह्या उघाडीतून पाणी पलीकडे जाण्यासाठी ह्या उघाडी खालून मार्ग खोदून व स्वछ करणे जरुरीचे होते. तसेच पुढे पाणी जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागेतून तात्पुरते खोदकाम करून पाण्याचा निचरा जाण्यासाठी मार्ग तयार करणे आवकश्यक होते. पण ते अजूनही झाले नाही.
उमेळे येथील समाज सेवक श्री दिलीप राऊत ह्यांनी जानेवारी २०२१ मध्ये पत्र लिहून ह्या ठिकाणी कायमस्वरूपी गटार बांधावे असे निवेदन वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग आयचे उपायुक्त श्री प्रताप कोळी ह्यांना दिले होते. ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून हा मार्ग जातो ती जमीन महानगर पालिकेने अधिग्रहण करावी व शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा असे दिलीप राऊत ह्यांनी सुचविले होते. ह्या बाबत बांधकाम विभागाचे श्री प्रताप साटम ह्यांच्याशीही व्यक्तिगत संपर्क साधला होता. ह्या विषयी विरार येथील मुख्य कार्यालयातील श्री गिरगावकर व श्री लाड ह्या उपायुक्तांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन विनंती केली होती.
शेजारील घरासमोर पाणी साचल्याने त्यातून जाता येताना जंतू संसर्ग होऊ शकतो. लेप्टो सारख्या रोगाची लागण व पुढे करोना ही होऊ शकतो. म्हणून वसई विरार शहर महानगर पालिकेने येथे पाण्याचा निचरा होण्याची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी दिलीप राऊत ह्यांनी केली आहे.