मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राहण्याची खात्री देतील अशा गावात इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय विभागास दिले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या वेळी सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच 10 वीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास करून, 12 वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा.असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांनी कोरोनाचा आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शैक्षणिक विभाग उचलणार आहे. यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.