banner 728x90

कोरोना, लसींचा गोंधळ, पावसाची दांडी, बेरोजगारीचे संकट याचा सामना कसा करायचा? सामनाच्या अग्रलेखातून सवाल

banner 468x60

Share This:

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले असून, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले. याचे थैमान अद्यापही कायम आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोकाही आहे. लखनौमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला तसे काही कोरोना लाटेबाबत करता येणार नाही का?. कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे. 

आजचा सामनातील अग्रलेख :
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा तडाखा अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करूनही थांबलेला नाही. तिसऱ्या लाटेची दहशत कायम आहे. लखनौमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला तसे काही कोरोना लाटेबाबत करता येणार नाही. एक तर बेपर्वा लोकांवर दहशत निर्माण करून कोरोना निर्बंधांचे नियम पाळण्यास भाग पाडावे लागेल, नाहीतर लोकांनी स्वतःच नम्रपणे नियमांचा स्वीकार करून आणखी काही काळ जगावे लागेल. कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही इतकाच सल्ला आम्ही आज देऊ शकतो! असे शिवसेनेने म्हटले आहे .
मुंबईची लोकल ट्रेन सेवा बंद आहे. सिनेमा, नाटय़गृह बंद पडल्याने या झगमगत्या व्यवसायावर जळमटे येऊ लागली; मुंबईचे बॉलीवूड व त्यांचे चमकते सितारे ही महाराष्ट्राची ओळखच नव्हे, तर वैभव मानले जाते, पण आता हा झगमगाट काळोखात गडप झाला आहे. लाखो लोकांचा रोजगार त्यामुळे ठप्प झाला आहे. कोल्हापूरप्रमाणेच मुंबईतील व्यापारी संतप्त झाल्याचे दिसत आहे.
सध्या आठवडय़ातील पाच दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. आता मुंबईचे व्यापारी मंडळही बोलू लागले की, दुकानांची वेळ वाढवा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू. शाळा, कॉलेज बंदच आहेत तसे हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्योगाचीही वाताहत झाली. हॉटेलचा कर्मचारीवर्ग बेरोजगार झाला आहे त्याचप्रमाणे हॉटेल्सना भाज्या, दूधपुरवठा करणारे, लॉण्ड्रीवाले हे सगळेच धुळीस मिळाले आहेत.
कोरोना व त्यामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे लोकांचे साफ कंबरडे मोडले. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असेल तर निर्बंध हटवावेत, असे सगळय़ांचेच म्हणणे पडत आहे. एका बाजूला कोरोनामुळे कडक निर्बंध तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविल्याचे विदारक चित्र आहे. पाऊस गायब झाल्याने राज्यातील पाच जिल्ह्यांत दुष्काळांची गिधाडे फडफडू लागली आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत पाऊसच गायब झाला आहे. कोकणातही पुरेसा पाऊस झाला नसल्याची नोंद आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 लहान-मोठय़ा धरण प्रकल्पांत जेमतेम 25 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध व दुष्काळ अशा कात्रीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक सापडले आहेत.
केंद्राने नव्या फेरबदलात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बदलले व मनसुख मांडविया यांना आणले. पण लस तुटवडय़ाचा गोंधळ सुरूच आहे. केंद्रशासित लडाखसारख्या प्रदेशात 100 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, पण दुसऱ्या ‘डोस’चा गोंधळ सर्वच स्तरावर सुरू आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, राज्यांकडे साधारण दीड कोटीपेक्षा जास्त ‘डोस’ उपलब्ध आहेत. पण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा स्पष्ट दिसत आहे. मधून मधून लसीकरणास ब्रेक लागत आहे. लसीचा गोंधळ, पावसाची दांडी, निर्बंधामुळे निर्माण झालेले बेरोजगारीचे संकट या सगळय़ांचा सामना कसा करावा हा प्रश्न आहेच, असे शिवसेनेने म्हटले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!