banner 728x90

जिल्हा परिषदेच्या शिक्षकात संचारला पत्रकार! नियम धाब्यावर बसवून चालवतोयं दैनिकाची ‘शाळा ‘

banner 468x60

Share This:


पालघर – 
योगेश चांदेकर 

banner 325x300

डहाणू : पत्रकारितेच्या ग्लॅमरची भुरळ पडल्याने पालघर (Palghar) जिल्हा परिषदेचा एक शिक्षक सेवा शर्तीचे सर्व नियम धाब्यावर बसवून जवळपास चार वर्षांपासून दैनिक चालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ‘आरएनआय’ (RNI)कडे नोंदणी केली नसतानाही हा संपादक बनलेला शिक्षक दैनिक प्रकाशित करण्याचा प्रताप करत आहे. आपल्या या पत्रकारितेच्या माध्यमातून एकप्रकारे त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे. शाहू संभाजी भारती असे या शिक्षकाचे नाव असून, डहाणू पंचायत समितीअंतर्गत एका शाळेत ते कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संहितेचे उघडपणे उल्लंघन करून ते रयतेचा कैवारी नावाने जवळपास चार वर्षांपासून दैनिक प्रकाशित करत आहेत. ‘रयतेचा कैवारी’ होण्याच्या नादात त्यांनी केवळ सेवा शर्तीच पायदळी तुडविल्या नाहीत, तर वृत्तपत्रांची नोंदणी करणाऱ्या ‘आरएनआय’च्या नियम डावलले आहेत. वृत्तपत्रे किंवा तत्सम प्रकाशनांना आरएनआयकडे नोंदणी करणे बंधनकारक असतानाही अंगात पत्रकारिता संचारलेल्या शाहू भारती यांनी नोंदणी न करताच दैनिक चालवण्याचा प्रताप केला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी राज्यभरात आपल्या दैनिकांचे प्रतिनिधी नियुक्त करून त्यांना ओळखपत्र देत ‘शाळा’ चालविली आहे. आपली पत्रकारितेची हौस भागवताना त्यांनी वरिष्ठांकडून परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे.

नियुक्ती शिक्षणक्षेत्रात, तर ‘कार्यगौरव’ पत्रकारितेचा

संपादक शिक्षक शाहू भारती यांना अध्यापन कार्याऐवजी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल 2022 या वर्षासाठी बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारही जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक पत्रकारांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. प्रत्यक्ष शिक्षक म्हणून नियुक्ती असताना शिक्षण क्षेत्रातील कार्याऐवजी नियमांचे उल्लंघन करून वृत्तपत्र चालविणाऱ्या भारती यांना पत्रकारितेसाठी हा पुरस्कार मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पालघर जिल्हा आदिवासीबहूल असल्याने या भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर काही धोरणात्मक बदल केले. लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई, शिक्षकांना शाळेत मोबाईल वापरण्यास प्रतिबंध या बाबींचाही त्यामध्ये समावेश आहे. असे असताना शाहू भारती यांनी वृत्तपत्र सुरू ठेवून या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रकार चालविला आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिले आहे.

शिक्षक शाहू भारती यांची होणार चौकशी

दरम्यान, या प्रकाराबाबत शिक्षक शाहू भारती यांची चौकशी करण्यात येणार असून, खुलासा मागविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी शिक्षक भारती यांची या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे सांगितले. दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय डहाणू पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वसंत महाले यांनीही भारती यांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असून, योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!