नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा एक आठवडा पूर्ण होत असताना डझनभर आमदारांनी; तसेच राज्यसभेच्या एका विद्यमान खासदाराने भाजपला ‘धक्का’ देण्याची तयारी चालविली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ‘मेगाभरती’अंतर्गत भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे. पक्ष बदलण्याचे टायमिंग चुकलेल्या या आमदारांची राजीनामे देण्याची तयारी असून ते तिन्ही पक्षनेत्यांच्या संमतीची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले त्यांना त्या-त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची पूर्वअट स्वीकारावी लागणार आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेला एक आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. पण त्याला काँग्रेसमध्ये परतण्यावाचून पर्याय नसेल, असे सूत्रांनी सांगितले. नागपूर येथे होऊ घातलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर त्यांच्या प्रस्तावावर विचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करुन विजयी झालेले सात आमदार संबंधित पक्षांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत, तर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा प्रभाव असलेले भाजपचे चार असंतुष्ट आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते. नागपूरचे अधिवेशन संपल्यानंतर हे ‘ऑपरेशन’ राबवण्याचा तिन्ही पक्षांचा इरादा आहे.
राज्यसभा सदस्यही नाराज
राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर एका राज्यसभा सदस्याचाही भाजपविषयी भ्रमनिरास झाला असून या खासदाराने पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची तयारी दाखविली आहे. संबंधित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संपर्कात आहे. पवार सांगतील तेव्हा राजीनामा देऊन पक्षात प्रवेश करण्याची या राज्यसभा सदस्याची तयारी असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.
डझनभर आमदार भाजपला धक्का देणार?
Recommendation for You

Post Views : 36 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 36 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 36 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 36 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…